Join us

‘जंजीर’मध्ये देव आनंद नायक असते तर...; जावेद अख्तर यांनी जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 7:02 AM

दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबई : ‘जंजीर’ या चित्रपटातील नायकाच्या भूमिकेसाठी आधी देव आनंद यांना विचारणा झाली होती. मात्र, त्यांनी तो नाकारला. देव आनंद यांनी चित्रपट स्वीकारला असता तर ‘जंजीर’ वेगळाच झाला असता, असे उत्तर प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी देताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला. दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.

उत्सवाचे यंदा ११वे वर्ष आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जावेद अख्तर यांना ‘जंजीर’विषयी प्रश्न विचारला असता, त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. आपल्या सुरूवातीच्या दिवसात वांद्रे येथील एका बंगल्याच्या पोर्चमध्ये आपण झोपायचो. जर ‘जंजीर’मध्ये देवानंद असते तर पुन्हा त्या पोर्चमध्ये झोपायची पाळी आली असती, अशी मार्मिक टिप्पणी अख्तर यांनी यावेळी केली. 

..म्हणून डॅनी ‘शोले’मध्ये नाहीतगब्बरसिंगच्या भूमिकेसाठी सलीम यांच्या डोक्यात डॅनीचे नाव होते. मात्र, त्याचवेळी डॅनी हे अफगाणिस्तानमध्ये दुसऱ्या सिनेमात अडकले होते. त्यामुळेच ही भूमिका अमजद खान यांना मिळाल्याचे सलीम खान म्हणाले. 

आम्ही एकमेकांना कसे मिस करतो?  जर आपला हात कापला गेला असेल आणि पायाला खाज आली तर खांद्यांचा भाग खाली जाऊन खाजवू पाहतो आणि मग लक्षात येते की, आपल्याला हात नाही. ती जी अवस्था आहे तीच नेमकी माझ्या मनात आमच्या जोडीबद्दल असल्याचे सलीम खान म्हणाले. तर अडचणीच्यावेळी मी सलीम यांनी काय सल्ला दिला असता, याचा विचार करून  सलीम मला जो सल्ला देतात मी त्याचे पालन करतो, असे सांगत दोघांनी एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

आमचे कसे जुळते ?आठवणींची पोतडी उघड करताना जावेद अख्तर म्हणाले की, सहकारी आणि प्रख्यात पटकथाकार सलीम खान यांचे वडील पोलिस अधिकारी होते. त्यांनी गब्बर नावाच्या एका गुंडाचा सामना केल्याचा किस्सा मला सलीम खान यांनी सांगितला होता. ‘शोले’च्या दरम्यान, मला त्या नावाची आठवण झाली. म्हणून मी खलनायकाचे नाव ‘गब्बर’ ठेवावे, असे सुचविले. जे सलीम यांना आवडले. तर दिल्लीत मी एका महोत्सवात अमजद खान यांची भूमिका पाहिली होती. ते  मी सलीम खान यांना सांगितले. ‘शोले’च्यावेळी सलीम यांनी मला त्याची आठवण करून दिली व त्यानंतर अमजद त्या चित्रपटात आले.

टॅग्स :जावेद अख्तरसलीम खानराज ठाकरेमनसे