नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्याच्या सात सदस्यांसाठी दिल्लीत हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपाकडून रामदास आठवले यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले आहे. तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेवर निवडून आणून, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावे, असा भाजपचा प्रयत्न असल्याचे समजते. या चर्चांवर आता भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासातील आहेत. राज्यात शिवसेनेच्या मदतीने आता सरकार स्थापन करणे शक्य नसल्याने फडणवीस यांचा केंद्रात उपयोग करून घ्यावा, असे भाजप श्रेष्ठींचे मत आहे. तसेच, सध्या राज्यसभेवर असलेले अमर साबळे पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. माजी खा. अजय संचेती यांच्या नावाचीही चर्चा सुरू असून, उदयनराजे भोसले यांचेही प्रयत्न चालले आहेत. एका ज्येष्ठ अर्थतज्ज्ञाला महाराष्ट्रातून राज्यसभेवर आणण्याचा भाजपचा विचार आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंनी आपले मत व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्राला फायदाच होईल, असे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत येणं किंवा न येणं हे फडणवीसांच्या मर्जीवर नसून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. देवेंद्र हे दिल्लीत गेले तर मला आनंदच होईल, या निर्णयाचे स्वागत करेन. कारण, ते दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राला फायदाच होईल, असे एकनाथ खडसेंनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. सध्या, देवेंद्र फडणवीस हे दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी गेल्या 8 दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्या पार्श्वभूमीवर या चर्चा जोर धरत आहेत.
दरम्यान, राज्यसभेवरील सात जागांसाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे तीन जण सहजपणे विजयी होतील, असे दिसते. दोन जागा मिळाव्यात, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असून, त्यासाठी सेनेशी बोलणी सुरू आहेत. काँग्रेसचा एकच उमेदवार निवडून येईल. निवडून येणाऱ्या सात जणांमध्ये शरद पवार हे निश्चितच असतील. दुसऱ्या जागेसाठी यशस्वी प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादीचे माजिद मेमन यांना उमेदवारी मिळू शकेल.