दिवाळीत नियमांचे पालन न केल्यास जीवघेणे प्रदूषण, हवामान खात्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 06:20 AM2023-11-09T06:20:42+5:302023-11-09T06:22:18+5:30
मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्यानुसार कार्यवाहीही सुरु झाली आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही तर दिवाळीतल्या फटाक्यांमुळे वायू प्रदूषणात आणखी भर पडेल, अशी भीती व्यक्त करतानाच पुढील दोन दिवस मुंबईची हवा वायू प्रदूषणाच्या मध्यम श्रेणीत नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्यानुसार कार्यवाहीही सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे वायू प्रदूषण मध्यम ते खराब या श्रेणीत नोंदविले जात आहे. पुढील दोन दिवस वातावरणात फार काही फरक पडणार नाही, असे मत मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी व्यक्त केले.
पार्टिक्युलेट मॅटर (पी एम)
हवेमध्ये असलेले विविध आकाराचे प्रदूषक घटक हे कण धूळ, परागकण, काजळी आणि धूर यांचे मिश्रण असते.
पार्टिक्युलेट मॅटर धोकादायक असून ते श्वसनावाटे शरीरात
जाण्याची शक्यता असते. हे घटक जितके लहान असतील तेवढे ते अधिक धोकादायक ठरतात.
कारण सूक्ष्म कण रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करू शकतात. हे सूक्ष्म कण हवेमध्ये बराच काळ टिकून राहतात आणि लांबवर पसरतात.
बुधवारची प्रदूषणाची पातळी
भांडुप ११०
मालाड १२१
माझगाव १४८
बोरिवली १५६
बीकेसी १४३
चेंबूर १३०
अंधेरी १११
नवी मुंबई १२८
कुलाबा ९२
वरळी ७३