मुंबई - एकीकडे कोरोना संकटाचा सामना सर्वांना करावा लागत असताना दुसरीकडे मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे, मराठा समाजाने संताप व्यक्त केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपा नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, टूलकीट व राहुल गांधींसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरुन एकप्रकारे निवडणुकांचं आव्हानच दिलं आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मंगळवारी (18 मे) भाजपची मराठा आरक्षणविषयक बैठक झाली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना काँग्रेसचं 'कथित' टूल किट आणि राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्यावर करत असलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आजही निवडणुका जिंकू, असा विश्वास व्यक्त केला. 'पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचं षड्यंत्र रचण्यात येत असून उद्या निवडणुका घेतल्या तर मोदींना 400 पेक्षा जागा मिळतील,' असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
काय आहे टूलकीट
टूलकीट हे एक असं डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर समर्थन कसं मिळवावं, कोणते हॅशटॅग वापरावेत, आंदोलनावेळी जर काही अडचणी आल्या तर कुठे संपर्क करावा, आंदोलनावेळी काय करावं, काय करु नये असा सर्व कार्यक्रम या टूलकीटमध्ये सांगितला आहे.
कोरोना परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नका!
कोरोनाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पुन्हा पुन्हा लॉकडाऊन लावला जात आहे. मराठा समाजाचा संताप उफाळून येऊ नये व समाजाने आंदोलन करू नये, असे सरकारला वाटते. अशा प्रकारे लॉकडाऊन लाऊन मराठा समाजाचा संताप थंड होईल, असे राज्यातील सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
भाजपा कायदेतज्ज्ञांची समिती नेमणार
वर्षानुवर्षे संघर्ष करूनही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नव्हते. देवेंद्र फडणवीस सरकारने समाजाला आरक्षण दिले. ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले. फडणवीस सरकार सत्तेवर असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही या कायद्याला स्थगिती आली नव्हती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कधीही मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील अनेक परिच्छेदात महाविकास आघाडी सरकारच्या चुका व ढिलाई दिसून येते. आघाडीने हा खटला जिद्दीने लढविला नाही. निकालपत्राचा अभ्यास करून सरकारची पोलखोल करण्यासाठी भाजप कायदेतज्ञांची समिती नेमणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.