Join us

"सगळेच निघून गेले तर पक्षात उरणार कोण?" सचिन पायलट यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 3:42 PM

एकापाठोपाठ एक युवा नेते पक्ष सोडत असल्याने सगळेच निघून गेले तर पक्षात उरणार कोण, असा सवाल काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने उपस्थित केला आहे

ठळक मुद्देराजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटावर एकच उत्तर आहे. ते म्हणजे सचिन पायलट यांना रोखणेपायलट यांची समजूत काढून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला गेला पाहिजेअसाच जर प्रत्येक जण पक्षातून निघून जाऊ लागला, तर शेवटी पक्षात उरणार कोण?

मुंबई - राजस्थानमधील युवा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केलेल्या बंडखोरीमुळे काँग्रेसच्या गोटात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पायलट यांच्यासोबत त्यांच्या समर्थक आमदारांचा मोठा गट असल्याने राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वातील सरकार अस्थिर झाले आहे. त्यामुळे नाराज आमदारांची मनधरणी करून पायलट यांचे बंड थंड करण्यासाठी अशोक गहलोत यांच्यासह पक्षश्रेष्ठींनी जोर लावला आहे. मात्र एकापाठोपाठ एक युवा नेते पक्ष सोडत असल्याने सगळेच निघून गेले तर पक्षात उरणार कोण, असा सवाल काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने उपस्थित केला आहे

काँग्रेसचे महाराष्ट्रातील जेष्ठ नेते संजय निरुपम सचिन पायलट यांच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ‘‘राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटावर एकच उत्तर आहे. ते म्हणजे सचिन पायलट यांना रोखणे. त्यांची समजूत काढून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला गेला पाहिजे. असाच जर प्रत्येक जण पक्षातून निघून जाऊ लागला, तर शेवटी पक्षात उरणार कोण?’’ 

दरम्यान, सचिन पायलट यांची नाराजी समोर आल्यानंतर कपिल सिब्बल, शशी थरूर, कार्ती चिदंबरम यांच्यासह काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच केंद्रीय नेतृत्वाने याबाबत लक्ष घातल पाहिजे, असे म्हटले आहे. यापूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतरही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र त्यावेळी शिंदे यांना रोखणे काँग्रेसला शक्य झाले नव्हते.

आता राजस्थानमध्ये एकीकडे सचिन पायलट यांनी बंडखोरी केली असतानाच सोमवारी अशोक गहलोत यांनी प्रसारमाध्यमांसमोर १०० हून अधिक आमदारांना हजर करत शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यापूर्वी आपल्याकडे ३० आमदारांचे पाठबळ असून, अशोक गहलोत सरकारने बहुमत गमावले आहे, असा दावा सचिन पायलट यांनी केला होता.

 

टॅग्स :काँग्रेससंजय निरुपमराजकारण