मुंबई : सुट्टीच्या काळातील गर्दीमुळे खासगी बस आणि ट्रॅव्हल्सवाले जादा भाडे आकारतात. त्यामुळे आता खासगी बसच्या तिकिटाच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जनतेने पुढे येत, अधिक भाडे घेणाऱ्या खासगी वाहनांविरोधात तक्रार करावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार तातडीने योग्य चौकशी करण्यात येईल. संबंधित खासगी वाहनांनी जास्त भाडे आकारल्याचे स्पष्ट झाल्यास, कंत्राटी बस परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.खासगी वाहन चालक-मालकांनी दीडपटीपेक्षा जास्त भाडे आकारल्यास, किंबहुना पैशाची मागणी केल्यास ०२२-६२४२६६६६ या निशुल्क क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल. मुंबईकर १८००२२०११० या निशुल्क टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदवू शकतात. त्याचप्रमाणे, आॅनलाइन तक्रारदेखील नोंदविता येणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, खासगी कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यानुसार, खासगी कंत्राटी वाहनांना आता गर्दीच्या हंगामाच्या काळात एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीतजास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे. केंद्र शासनाच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्टने (सीआयआरटी) सादर केलेल्या अहवालाच्या आधारे दीडपट भाडे आकारण्याची मुभा खासगी वाहनांना देण्यात आली आहे.
जादा भाडे आकारल्यास परवाना रद्द!, खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनो सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 5:31 AM