फटाके फोडाल तर नवीन वर्षाच्या हवेची गुणवत्ता हाेईल खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:04 AM2020-12-27T04:04:52+5:302020-12-27T04:04:52+5:30
आवाज फाउंडेशन : स्वागतासाठी फटाक्यांचा आवाज नकाेच लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या रुग्णांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होऊ नये, ...
आवाज फाउंडेशन : स्वागतासाठी फटाक्यांचा आवाज नकाेच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या रुग्णांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होऊ नये, म्हणून मुंबईकरांनी दिवाळीत फटाके फोडू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेने मुंबईकरांना केले होते. मुंबईकरांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्याप्रमाणे, मुंबईकरांनी दिवाळीत संयम बाळगला, तसाच संयम आता नववर्षाच्या स्वागतला दाखवायला हवा. नववर्षाचे स्वागत साधेपणाने करावे. नववर्षाच्या स्वागताला फटाके फाेडल्यास ते हवेची गुणवत्ता खराब करतील. म्हणून नवीन वर्षाच्या स्वगाताला फटाके फोडू नका, असे आवाहन ध्वनी आणि वायुप्रदूषणाबाबत काम करणाऱ्या आवाज फाउंडेशनने केले.
आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितले की, आवाजने नोव्हेंबरमध्ये फटाक्यांची चाचणी केली आणि तपासले की, सर्व २८ प्रकारांच्या फटाक्यांमध्ये विषारी रसायने आहेत. काहींमध्ये सर्वाेच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या बेरियम नायट्रेटचा समावेश आहे. १२ प्रकारांच्या ग्रीन क्रॅकर्समध्येही बंदी घातलेल्या बेरियम नायट्रेट, इतर नायट्रेट्स आणि सल्फेट्ससह विषारी रसायने आहेत. असे फटाके फोडल्यास ते नवीन वर्षाच्या हवेची गुणवत्ता खराब करतील. कारण आवाजने फटाक्यांमधून होणारे वायुप्रदूषण मोजले. यावेळी ध्वनी आणि वायुप्रदूषण नोंदविण्यात आले होते.
हवेतील कणांमध्ये घन पदार्थ आणि द्रव यांचे मिश्रण असते. प्रदूषकांमध्ये सल्फेट आणि नायट्रेट्स, कार्बन आणि खनिज धुळीचा समावेश आहे. यामुळे श्वसन रोग, कर्करोग, यकृत बिघडणे आणि इतर आजार होऊ शकतात. ज्यामुळे वायुप्रदूषणाशी संबंधित मृत्यूचे प्रमाण वाढते. वायुप्रदूषणामुळे होणारे आजार कोविडसारख्या रुग्णांना धोकादायक ठरतात. त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबईतील सर्व रहिवाशांच्या आरोग्याच्या हितासाठी नवीन वर्षात फटाक्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घाला, अशी विनंती आवाजने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना केली आहे.
दरम्यान, कोविडबाधित रुग्णांमध्ये श्वसनाचा मुख्य प्रश्न असतो. त्यांची प्राणवायू पातळी खालावण्याची शक्यता असते. त्यामुळे फटाक्यांच्या धुराचा कोविड रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन नववर्षाच्या स्वागतला फटाके फोडू नये, असे आवाहन फाउंडेशनकडून सातत्याने करण्यात येत आहे.
...............................