मुंबई - उत्तर भारतात पडलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर गुरुवारी दिल्ली धुक्यात हरविली असतानाच मुंबईत मात्र प्रचंड प्रमाणात धूरके नोंदविण्यात आले आहे. विशेषत: मागील काही दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असतानाच गुरुवारी मुंबईवर जमा झालेल्या धुक्यात धूळ मिसळली; आणि निर्माण झालेल्या धूरक्याने पुन्हा एकदा मुंबईला वेढले आहे.मागील आठवड्याभरापासून राज्यातील प्रमुख शहरांसह मुंबईच्या किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. विशेषत: यापूर्वीच मुंबईचे किमान तापमान १४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले होते. तर गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले असून, येथील धुक्यातही वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे वाढते धुके आणि येथील वातावरणात पसरलेली धूळ यांच्या मिश्रणाने तयार झालेले धूरके शहरावर वाढत असून, गुरुवारी मुंबईवर सर्वत्र धूरक्याची चादर पसरली होती.उत्तर भारतामध्ये पंजाब, त्रिपुरा, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार येथील किमान तापमानात कमालीची घट नोंदविण्यात आली आहे. शिवाय धूरक्याने तर तेथे कहर केला आहे. तेथील धूरक्याची चादर पुढील तीन ते दोन दिवस अथवा आठवडाभर राहील, असा अंदाज स्कायमेटने वर्तविला. गोरखपूर, वाराणसी, गया, पटणा, अलाहाबाद, लखनऊ, जालंधर, लुधियाना, अमृतसर, अंबाला येथे वातावरण बदलाचा फटका बसल्याचे स्कायमेटकडून सांगण्यात आले.नेहमीपेक्षा यंदा प्रमाण जास्त‘ओखी’ चक्रीवादळानंतर मुंबईच्या वातावरणात बदल झाले होते. परिणामी येथे धूरके जमा झाले होते. शहरात फोर्ट, नरिमन पॉइंट, गिरगाव, लालबाग, परळ, वरळी, माहिम, दादर, सायन, कुर्ला, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगावसह मुलुंड आणि मुंबईच्या आसपासच्या प्रदेशात धूरक्याची नोंद झाली होती.सफरच्या नोंदीनुसार, मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा घसरला असून, अंधेरी, बोरीवली, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल येथे सर्वाधिक धूरक असल्याची नोंद झाली आहे. थंडीत धुके पसरणे ही नवी बाब नाही. मात्र यावेळी प्रमाण अधिक आहे. मुंबईतील प्रदूषण आणि बांधकामांमुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे.मुंबईत दिल्लीच्या तुलनेने कमी प्रदूषण होते. समुद्राकडून वाहणाºया वाºयांचा मुंबईला फायदा होतो. मुंबईत सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यास प्रदूषण जबाबदार नाही, तर वातावरणातील बदल कारणीभूत आहेत.मुंबई शहराची फुप्फुसे असलेली खुले मैदाने कमी होत आहेत. त्यामुळे शहरात प्रदूषण वाढण्याची कारणे दिसून येत आहेत. वाहनांचा धूर हे प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे ते कमी करणे गरजेचे आहे. तसेच वाढणाºया महाकाय बांधकामामुळे धुळीकणांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पना वापरात येणे गरजेचे आहे. मुंबईतील लोकसंख्यादेखील प्रदूषणाला कारणीभूत आहे. या कारणात्सव असंख्य वाहने वाढलेली आहेत. नागरिकांना वसण्यासाठी शहरे उभी केली जात आहेत; पण यामुळे निसर्गाचा समतोल बदलत आहे.- संजय शिंगे, पर्यावरणवादीनूतनीकरणाच्या नावाखाली रस्त्याचे खोदकाम केले जाते. त्यामुळे धुळीकणांचे प्रमाण वाढत जात आहे. गगनचुंबी इमारती उभारल्यामुळे वारा वाहण्यास जागा उरलेली नाही. त्यामुळे धुळीकण एकाच ठिकाणी स्थिरावले जातात. तसेच रस्त्यावरील झाडांची कत्तल केल्यामुळे धुळीकणांचे (पीएम)चे प्रमाण वाढत आहे. सरकारी आदेशानुसार खोदकाम करण्याच्या ठिकाणी पाण्याचा फवारा मारणे गरजेचे आहे. त्यामुळे मातीचे कण हवेत न मिसळता जमिनीवर स्थिरावतील. परंतु खोदकामाच्या ठिकाणी तसे होत नाही.- डी. स्टॉलिन, पर्यावरणवादीमुंबईतील तापमान बदलामुळे व हवेच्या बदलामुळे धुळीकणांचे प्रमाण कमी-जास्त होत आहे. आता वाढलेले धुळीकणांचे प्रमाण पुढे कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. धुळीकणांचे प्रमाण मानवी आरोग्यास घातक आहे. वाहनांतून निघणारा धूर आणि सततच्या बांधकामांमुळे धुळीकणांचे प्रमाण वाढत चाललेले आहे.- गुफरान बेंग,प्रकल्प संचालक, सफरआताच्या क्षणी दिल्लीसारखी अवस्था मुंबईची झाली आहे. पण मुंबईला वेढलेल्या अरबी समुद्रामुळे व डोंगरामुळे वारा फिरत आहे. त्यामुळे मुंबईमधील धुळीकणांचे प्रमाण कमी-जास्त होत आहे. मुंबईची अशी प्राकृतिक रचना नसती तर दिल्लीपेक्षा वाईट स्थिती झाली असती. यामागचे कारण असे की, मुंबईमध्ये वाढती वाहनांची संख्या आणि त्यातून ८०० ते १ हजार वेगवेगळ्या प्रकारचे तयार होणारी संयुगे पर्यावरणास व मानवी शरीराला हानिकारक आहेत. यावर उपाय म्हणून सार्वजनिक वाहनांचा वापर करणे गरजेचे आहे. प्रगत देशातील शहरांमध्ये सार्वजनिक गाड्या मोठ्या प्रमाणावर धावत आहेत. त्यामुळे मुंबईमध्येदेखील सार्वजनिक गाड्यांची वाढ करून खासगी गाड्या कमी करणे गरजेचे आहे. १९९३ व १९९६च्या एमएमआरडीच्या अहवालाप्रमाणे बेस्ट गाडी ४ टक्के जागा वापर करीत होती आणि ६१ टक्के सेवा देत होती. तर खासगी मोटार गाड्या ८४ टक्के जागा वापर करून ७ टक्के सेवा देत होत्या. मुंबईमध्ये मोनो, मेट्रो प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत आहे. मेट्रो-३ प्रकल्पामुळे भूगर्भात खोदकाम केले जात आहे. मेट्रो-३ प्रकल्पाऐवजी मुंबईत ४५० बस वाढवणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा विचार न करता बांधकामांना मंजुरी दिली जाते. त्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढत आहे.- गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञ
दिल्लीत धुके तर मुंबईत धूरके, धुक्यात मिसळली धूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 7:07 AM