लिंगबदल तर झाला, आता त्यांचा आवाजही बदलणार
By संतोष आंधळे | Published: January 29, 2024 01:34 PM2024-01-29T13:34:07+5:302024-01-29T13:34:29+5:30
Health: आवाज आणि व्यक्तिमत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू. अनेकदा तर आवाजावरून माणसाची ओळख पटते. त्यामुळेच ‘मेरी आवाजही पहचान है’ सारखी गाणी लिहिली जातात आणि आजही ती तन्मयतेने ऐकली जातात.
- संतोष आंधळे
(विशेष प्रतिनिधी)
आवाज आणि व्यक्तिमत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू. अनेकदा तर आवाजावरून माणसाची ओळख पटते. त्यामुळेच ‘मेरी आवाजही पहचान है’ सारखी गाणी लिहिली जातात आणि आजही ती तन्मयतेने ऐकली जातात. हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे लिंग बदल शस्त्रक्रिया करणाऱ्यांमध्ये आवाजावरून उडणारा गोंधळ. लिंग बदल शस्त्रक्रिया करून बाईचा पुरुष झाला किंवा पुरुषाची बाई झाली तरी मूळचा आवाज कायमच राहात होता. मात्र, त्यावरही आता वैद्यकीय विश्वाने उपाय शोधून काढला असून आवाज बदल ही ती शस्त्रक्रिया.
तृतीयपंथींच्या आवाज बदलाच्या शस्त्रक्रिया (कॉन्फरन्स ऑन ट्रान्स व्हॉइस सर्जरी) या विषयावर तीन महिन्यांपूर्वी मुंबईत वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी देशभरातून कान-नाक-घसा क्षेत्रातील २०० वैद्यकीय तज्ज्ञ मुंबईत आले होते. मुळात ज्यांना लिंग बदल शस्त्रक्रिया करायची असते त्यांच्यासाठी आवाजाचा मुद्दा कळीचा असतो. त्यातच वैद्यकीय तंत्रज्ञानात झालेल्या अभूतपूर्व प्रगतीमुळे या प्रकारच्या शस्त्रक्रिया सहजसाध्य झाल्या आहेत. त्यामुळे अनेकजण या शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांचे रूप अंतर्बाह्य बदलते. मात्र, आवाज तसाच राहतो.
तीन महिन्यांपूर्वी भारतात प्रथमच बॉम्बे हॉस्पिटलच्या व्हॉइस क्लिनिक विभागाच्या प्रमुख डॉ. नुपूर कपूर-नेरूरकर यांनी तृतीयपंथींच्या आवाज बदलाच्या शस्त्रक्रिया विषयावर मुंबईत वैद्यकीय परिषद भरवली होती. तसेच जगभरात या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर बर्लिन येथे १३ डॉक्टरांनी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ट्रान्स व्हॉइस सर्जन्स या संस्थेची स्थापना केली. त्यामध्ये डॉ. नेरूरकर या सदस्य आहेत. त्यांनी आजपर्यंत ६० पेक्षा अधिक अत्याधुनिक शस्त्रक्रिया तृतीयपंथींवर केल्या आहेत.
... अन् पायलचे आयुष्य परिपूर्ण झाले
गेल्या वर्षी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बॅले डान्सर आणि मॉडेल पायल निकुंभ यांच्यावर ही आवाज बदल शस्त्रक्रिया झाली. त्या सांगतात, जर मी महिला आहे तर सर्व गोष्टी या स्त्रीसारख्या असाव्यात असे मला कायम वाटत होते. माझ्या स्त्री होण्यासाठीच्या लागणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया पाच-सहा वर्षापूर्वी झाल्या होत्या. मात्र माझा आवाज पुरुषांसारखा होता. इंटरनेटवर शोध घेतल्यानंतर मला मुंबईतील रुग्णालयात या शस्त्रक्रिया होत असल्याचे कळाले. माझ्या स्वरयंत्रावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करून आज काही महिने झालेत, माझा आवाज आता पूर्णपणे महिलांसारखा झाल्याने आयुष्य परिपूर्ण झाले आहे. मी खूप आनंदी आहे.
या शस्त्रक्रियांचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे आम्ही मुख्य प्रवाहात येण्याच्या दिशेने वैद्यकीय क्षेत्राने टाकलेले हे एक चांगले पाऊल आहे. मात्र, केवळ आवाजात बदल होऊन चालणार नाही तर आमच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही बदलला पाहिजे. आज राज्यात एक लाखापेक्षा जास्त तृतीयपंथी आहेत. त्यापैकी जवळपास ५० हजारांपेक्षा अधिक तृतीयपंथी मुंबई प्रदेश प्राधिकरण परिसरात राहत आहेत.
- सलमा शेख, माजी उपाध्यक्ष,
महाराष्ट्र तृतीयपंथी विकास महामंडळ
काय आहे शस्त्रक्रिया?
आवाज बदलण्याच्या शस्त्रक्रियेत गळ्यावर चीर घेऊन स्वरयंत्रावर जात शस्त्रकिया केली जात होती. त्यामध्ये स्वरांच्या दोरांना ताणले जात होते. पण आता वेंडलर्स ग्लोटोप्लास्टी ही शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया जर्मन येथील कान, नाक, घसा तज्ज्ञ जर्गन वेंडलर यांच्या नावावर आहे. विशेष म्हणजे यामध्ये गळ्यावर कोणतीही चीर घेतली जात नाही. एंडोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाते. यात स्वरयंत्राची घडीची लांबी कमी केली जाते. त्यामुळे पुरुषांचा आवाज महिलांसारखा होत असल्याचे डॉ. नुपूर कपूर-नेरूरकर सांगतात.