मुंबई: आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचा लाँग मार्च मुंबईत येऊन धडकल्यानंतर आता राज्य सरकारला खडबडून जाग आली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारीच सहा जणांचा उच्चस्तरीय मंत्रीगट स्थापन केला होता. तेव्हापासून सरकारी पातळीवर शेतकऱ्यांचे समाधान कसे करायचे, यासाठी सध्या जोरदार खलबतं सुरू आहेत. मात्र, सरकारने नेहमीप्रमाणे आपल्या तोंडाला पाने पुसू नयेत, यासाठी काही वेळापूर्वीच मोर्चेकऱ्यांकडून सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. सरकारने कोणतीही चालबाजी करून मोर्चेकऱ्यांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न केला तर आम्ही उपोषणाला बसू, असा इशारा या मोर्चाचे नेतृत्त्व करणारे आमदार जिवा पांडू गावित आणि अजित नवले यांनी दिला आहे. तर दुसरीकडे विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांवर कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी होईल, असे जाहीर केले. आम्ही मोर्चा काढण्यापूर्वी शेतकऱ्यांशी संपर्क साधला होता. तेव्हा आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मोर्चा काढण्यावर ठाम होते. याशिवाय, दहावीची परीक्षा लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी ज्याप्रकारे समंजसपणा दाखवला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतूक केले. गिरीश महाजन मोर्चात सहभागी होणे, हा केवळ नौटंकीपणा होता, या अजित पवारांच्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. सर्व राजकीय पक्षांनी या मोर्चाला समर्थन दिल्याचे बोलले जाते. मात्र, सरकार असल्यामुळे आम्हाला समर्थन देता येत नाही. आम्हाला हे प्रश्न सोडवावे लागतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Kisan Long March: सरकारने चालबाजी केली तर उपोषणाला बसू; मोर्चेकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 11:55 AM