सरकारला खड्डे दिसत नसतील, तर आंदोलन दिसेल - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 02:40 PM2018-07-16T14:40:20+5:302018-07-16T14:44:45+5:30
मनसैनिकांनी केलेले आंदोलन योग्यच असल्याचे ते म्हणाले आहेत.
मुंबई : सायन-पनवेल मार्गावर पडलेले खड्डे व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी (16 जुलै) नवी मुंबईतील तुर्भे येथील पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडले. दरम्यान, याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. मनसैनिकांनी केलेले आंदोलन योग्यच असल्याचे ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मनसैनिकांनी केलेले आंदोलन योग्यच आहे. जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर आंदोलन दिसेल, असे राज ठाकरे म्हणाले.
सायन-पनवेल महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यामध्ये दोन वर्षांपूर्वी याच मार्गावर बांधलेल्या उड्डाणपुलांचादेखील समावेश आहे. यामुळे सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच वाढत जात आहे. अशातच खड्ड्यांमुळे अपघातदेखील होत आहेत. मागील 10 दिवसात उरणफाटा व जुईनगर येथे खड्ड्यातमुळे बाईक अपघातात दोन जणांना प्राण गमवावे लागले आहेत. खड्डे बुजवण्याची मागणी करुन देखील प्रशासन दखल घेत नव्हते. अखेर मनसेने पीडब्ल्यूडीचे कार्यालयाविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारत खळ्ळ खट्याक आंदोलन केले. याप्रकरणी खात्याचे मंत्री व पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही मनसेने पोलिसांकडे केलेली आहे.
#WATCH: Maharashtra Navnirman Sena (MNS) workers vandalise the office of Public Works Department in Navi Mumbai over incidents of pothole deaths in the state. #Maharashtrapic.twitter.com/IT4qQpfMAW
— ANI (@ANI) July 16, 2018
दरम्यान, गेल्या आठवड्यात खड्ड्यांना मंत्र्यांची नावे देऊन महामार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणीदेखील मनसेने केली होती. याचीही दखल न घेतल्याच्या कारणामुळे अखेर सोमवारी सकाळी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, सचिव संदीप गलुगडे यांच्या नेतृत्वाखाली खळ्ळ खट्याक आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तुर्भे येथील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत मनसे कार्यकर्त्यांनी त्याठिकाणावरून पळ काढला होता.