मुंबई - फेरीवाल्यांविरोधातील कारवाई ही पालिका प्रशासन, फडणवीस सरकार आणि मनसे यांची मिलीभगत आहे. माझे पोलिसांना सुद्धा सांगणे आहे की, या गरीब फेरीवाल्यांना जर कोणी मनसेचे फालतू गुंड त्रास देत असतील, दादागिरी करत असतील, तर त्यांना अडवा. त्यांच्यावर कठोर कारवाई करा. जर या गरीब फेरीवाल्यांना पोलिसांचे संरक्षण मिळाले नाही, त्यांना जर मारहाण होत राहील. तर ते कायदा हातात घेतील. रस्त्यावर उतरतील, मग कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल आणि त्याची जबाबदारी फक्त तुमच्यावर असेल', असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम बोलले आहेत. मालाड पश्चिम येथे फेरीवाल्यांना दिलेल्या भेटीदरम्यान संजय निरुपम यांनी हे वक्तव्य केलं.
जोपर्यंत संविधानातील फेरीवाला संरक्षण कायदा मुख्यमंत्री लागू करत नाहीत, तोपर्यंत मुंबईतील कोणताही फेरीवाला अनधिकृत नाही. त्याला स्वतःच्या जागेवर धंदा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांना व्यवसाय करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम बोलले आहेत.
संजय निरुपम पुढे म्हणाले की, 'फेरीवाला संरक्षण कायदा हा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रयत्नाने केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार असताना पास करण्यात आला होता. पण महाराष्ट्र सरकार तो लागू करू इच्छित नाही. आम्ही तब्बल गेली साडेतीन वर्षे सतत महापालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्याची मागणी करत आहोत'.
'महाराष्ट्रात फेरीवाला संरक्षण कायदा लागू करावा. त्यासाठी प्रथम सर्वे करण्यात यावा. त्यासाठी प्रथम टाऊन व्हेंडिंग कमिटी स्थापन करून त्याद्वारे हा सर्वे करण्यात यावा. ज्यामध्ये व्हेंडर्स असोसिएशन, ट्राफिक वाहतूक विभाग, पालिका प्रशासन यांसारख्या सर्व क्षेत्रातील माणसे असावीत आणि जोपर्यंत हा सर्व्हे होत नाही. तोपर्यंत कोणत्याही फेरीवल्यावर कारवाई करण्यात येऊ नये. हा हायकोर्टाचा आदेश आहे. पण महाराष्ट्र सरकार आणि पालिका आयुक्त हा कायदा लागू करू इच्छित नाही. कारण असे झाले तर यांचे हप्ते बंद होतील. म्हणून भाजप सरकार आणि महापालिका प्रशासन हे मनसेच्या फालतू लोकांशी संगनमत करून फेरीवाल्यांना त्रास देत आहेत', असा आरोप संजय निरुपम यांनी केल आहे.