मुंबई : तेलगी प्रकरणात तेव्हा छगन भुजबळांचा राजीनामा घेतला नसता तर ते तुरुंगात गेले असते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. तेलगी प्रकरणावरून शरद पवार यांनी आपला राजीनामा घेतला. पण, आपणच तेलगीविरोधात कारवाई केली होती, असे मंत्री भुजबळ बीडमधील सभेत म्हणाले होते. शरद पवार यांनी मुंबईतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना त्याला उत्तर दिले. मी लढण्यासाठी तयार आहे. तुम्हीदेखील लढायला तयार राहा. ही विचारांची लढाई आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढाईची आहे. संभ्रम ठेवू नका, लोकशक्ती ही आपल्याच मागे आहे. माझ्यावर टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे लक्ष देऊ नका, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसेराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी बंड केल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी संघटनात्मक फेरबदल सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांची नियुक्ती केली आहे. मुंबईत मंगळवारी राष्ट्रवादीची बैठक झाली, त्यात पवारांनी रोहिणी खडसेंना नियुक्तीचे पत्र दिले. सप्टेंबरमध्ये शरद पवार जळगाव दौऱ्यावर जात असून, ही निवड करत त्यांनी संदेश दिल्याचे मानले जाते. बीड जिल्ह्यातील बबन गित्ते यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, सुशीलाताई बोराडे यांची महाराष्ट्राच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात महिलांचे संघटन वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले. विद्या चव्हाण नाराज नाहीत. त्यांच्या उपस्थितीत मला नियुक्तीचे पत्र देण्यात आले. विद्या चव्हाण यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाखालीच मी काम करणार आहे.- रोहिणी खडसे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष