Devendra Fadanvis: "जर उपमुख्यमंत्रीच व्हायचं होतं, मग अडीच वर्षांपूर्वी युती का तोडली?"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 10:39 AM2022-07-01T10:39:32+5:302022-07-01T10:39:43+5:30
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून सत्ता मिळवली, पुढे काय? असा प्रश्नार्थक विषय घेऊन अग्रलेख लिहिण्यात आला आहे.
मुंबई - महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आणि शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे त्यांच्या शपथविधीच्या काही तास आधीपर्यंत लोकांना समजत होते. मात्र, शपथविधीच्या काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांनाच चकित केले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या आश्चर्याचा धक्का शिवसेना नेत्यांनाही चांगलाच बसला आहे. त्यातूनच, आज शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर आणि फडणवीसांवर निशाणा साधण्यात आला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून सत्ता मिळवली, पुढे काय? असा प्रश्नार्थक विषय घेऊन अग्रलेख लिहिण्यात आला आहे. 'सत्ता हेच सगळय़ा प्रश्नांचे उत्तर बनले आहे. महाराष्ट्रात गुरुवारी जे घडले त्यावरून सत्ता हेच सर्वस्व आणि बाकी सगळे झूठ यावरच शिक्कामोर्तब झाले. ठीक आहे, अनैतिक मार्गाने का होईना, तुम्ही सत्ता मिळवली, पण पुढे काय? हा प्रश्न उरतोच. त्याचे उत्तर उद्या जनतेला द्यावेच लागणार आहे. कौरवांनी द्रौपदीस भरसभेत उभे करून बेइज्जत केले व धर्मराजासह सगळेच निर्जीव बनून हा तमाशा पाहत राहिले. तसेच काहीसे महाराष्ट्रात घडले, पण शेवटी भगवान श्रीकृष्ण अवतरले. त्यांनी द्रौपदीच्या अब्रूचे, प्रतिष्ठेचे रक्षण केले. जनता जनार्दन हा श्रीकृष्णाप्रमाणे अवतार घेईल व महाराष्ट्राची अब्रू लुटणाऱ्यांवर सुदर्शन चक्र चालवील… नक्कीच!, असे महाभारत सांगत सामनातून भाजप आणि बंडखोर गटावर हल्लाबोल करण्यात आला आहे.
मग अडीच-2.5 वर्षाचा फॉर्म्युल्यावरु का युती तोडली
महाराष्ट्रात गुरुवारी जे घडले त्यावरून सत्ता हेच सर्वस्व आणि बाकी सगळे झूठ यावरच शिक्कामोर्तब झाले. सत्तेसाठी आम्ही शिवसेनेशी दगाबाजी केली नाही, असे सांगणाऱयांनीच मुख्यमंत्रीपदाचा मुकुट स्वतःवर चढवून घेतला. तोदेखील कोणाच्या पाठिंब्यावर, तर या सर्व बंडाशी आमचा काही संबंध नाही असा भाव जे साळसूदपणे आणत होते, त्यांच्या पाठिंब्यावर. म्हणजे शिवसेनेविषयीची नाराजी वगैरे हा सगळा बनाव होता. आम्हाला आश्चर्य वाटते ते देवेंद्र फडणवीस यांचे. त्यांना पुन्हा यायचे होते मुख्यमंत्री म्हणून, पण झाले उपमुख्यमंत्री. दुसरे असे की, हाच म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे हा फॉर्म्युला निवडणुकीपूर्वी दोघांनी ठरवला होता. मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली?, असा सवालही राऊत यांनी सामनातून विचारला आहे.
तसेच, ठीक आहे, अनैतिक मार्गाने का होईना, तुम्ही सत्ता मिळवली, पण पुढे काय? हा प्रश्न उरतोच. त्याचे उत्तर उद्या जनतेला द्यावेच लागणार आहे, असेही त्यांनी सुनावले.
संजय राऊत आज ईडी कार्यालयात जाणार
राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले. मात्र, नियोजित कामामुळे संजय राऊत यांना ईडी (ED) कार्यालयात जाता आले नाही. त्यानंतर ईडीकडून संजय राऊतांना दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आले आहे. दुसऱ्यांदा पाठवण्यात आलेल्या समन्समध्ये १ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, संजय राऊत आज दुपारी १२ वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. यासंदर्भात एक ट्विट करत संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शरद पवार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंना टॅग केले आहे.
अटलजींचा वारसा संपला
अटल बिहारी वाजपेयींचे सरकार फक्त एका मताने कोसळत असतानाही अटलबिहारी विचलित झाले नाहीत. ''तोडफोड करून मिळालेल्या बहुमतास मी चिमटय़ानेही शिवणार नाही,'' असे ते म्हणालेच, पण त्यांनी पुढे जे सांगितले त्याची नोंद आजच्या भाजप नेत्यांनी घेणे गरजेचे आहे. ते लोकसभेच्या सभागृहात म्हणाले, ''मंडी सजी हुई थी, माल भी बिकने के लिए तैयार था, लेकिन हमने माल खरीदना पसंद नहीं किया था!'' अटलजींचा हा वारसा आता संपला आहे, असे म्हणत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर प्रहार केला.
दरम्यान, शपथविधी झाल्यानंतर काही वेळातच नव्या सरकारने फडणवीस सरकारच्या काळात असलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा कार्यान्वित केली. तर वाद सुरू असलेल्या मेट्रोचे कारशेड आरे येथेच होईल, असाही निर्णय घेतला. या निर्णयांवरून राष्ट्रवादीने नव्या सरकारवर सवाल उपस्थित केले.