Join us

मी मेले तर त्याची जबाबदारी सीबीआय घेणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 05:15 IST

इंद्राणी मुखर्जीचा सीबीआयला सवाल

मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने मंगळवारी पुन्हा एकदा तब्येतीचे कारण देत विशेष सीबीआय न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. मी मेले तर सीबीआय त्याची जबाबदारी घेणार का, असा सवाल तिने जामीन अर्जाला विरोध करणाऱ्या सीबीआयला न्यायालयात केला. मंगळवारी इंद्राणीने स्वत:च न्यायालयात आपली बाजू मांडली.

प्रकृती बिघडल्याचे कारण देत व कारागृहात आपल्या जीवाला धोका आहे, असे म्हणत इंद्राणीने आॅगस्ट महिन्यात विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सीबीआयने त्या वेळीही तिच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला होता. सीबीआयचा युक्तिवाद ग्राह्य धरत विशेष न्यायालयाने कारागृह प्रशासनाला इंद्राणी मुखीर्जीवर वेळीच योग्य उपचार करण्याचा आदेश दिला. तसेच इंद्राणी कारागृहातच अधिक सुरक्षित आहे, असेही न्यायालयाने म्हटले.

जामीन अर्ज फेटाळल्यानंतर काही दिवसांतच इंद्राणी मुखर्जीची तब्येत खालावली. सप्टेंबरच्या अखेरीस तिला दोनदा जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधारे तिने मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयात पुन्हा एकदा जामीन अर्ज दाखल केला.

टॅग्स :इंद्राणी मुखर्जीतुरुंग