मी तोंड उघडले तर शरद पवारांना पळता भुई थोडी होईल - प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 08:48 AM2018-02-05T08:48:02+5:302018-02-05T08:52:37+5:30
पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झालेल्या हिंदू-मुसलमान दंगलीसंदर्भात मिलिंद एकबोटे यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्याची शिफारस पुणे पोलिसांनी केली होती.
मुंबई - पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झालेल्या हिंदू-मुसलमान दंगलीसंदर्भात मिलिंद एकबोटे यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्याची शिफारस पुणे पोलिसांनी केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकबोटे यांना पाठीशी घातल्याचा सनसनाटी आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मी तोंड उघडले तर पवारांना पळता भुई थोडी होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दादर येथील आंबेडकर भवनात भारिपची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले, सासवड दंगलीनंतर पुणे पोलिसांनी एकबोटे यांच्यावर मोक्का लावण्याची तयारी केली होती. गुप्त वार्ता विभागानेही त्यावर शिक्कामोर्तब केले होते. तेव्हा राज्याचे गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. एकबोटे यांना मोक्का लावू नये अशी सूचनाच शरद पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांना केली होती. एकबोटेंना त्या वेळी मोक्का लागला असता तर कोरेगाव-भीमाचा हिंसाचार घडलाच नसता, असा दावा आंबेडकर यांनी केला. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ आंबेडकर यांनी पुणे पोलिसांची त्या वेळची नोट पत्रकारांसमोर सादर केली.
एकबोटे हे भाजपाशी संबंधित असतानाही राष्ट्रवादीने त्यांना पाठीशी घातले. शरद पवारांचे आजपर्यंतचे वर्तन ‘मुँह मे राम, बगल मे छुरी’ असेच आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा सहभाग असेल अशा कोणत्याही राजकीय आघाडीत भारिप बहुजन महासंघ सामील होणार नाही. राष्ट्रवादीमुळे २६ जानेवारी रोजी निघालेल्या संविधान बचाओ रॅलीत सहभागी झालो नव्हतो, असा खुलासाही आंबेडकर यांनी केला. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीबाबतची बोलणी म्हणजे चोराचोरांतली बोलणी असल्याची टीका आंबेडकरांनी केली. भाजपाविरोधात आघाड्या उभ्या राहात आहेत. हे चांगले लक्षण आहे. कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुका जो जिंकेल तोच २०१९च्या लोकसभेलाही आघाडीवर राहील, असे भाकीत आंबेडकर यांनी वर्तविले.
भारिप बहुजन महासंघाची नवी कार्यकारिणी आंबेडकर यांनी जाहीर केली. राज्य अध्यक्षपदी अशोक सोनवणे, जनरल सेक्रेटरी म्हणून कुशल मेश्राम, अमित भुईगळ तर विद्वत सभेचे प्रमुख म्हणून एम. एन. कांबळे यांची निवड करण्यात आल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
आरोप बिनबुडाचे - नवाब मलिक
शरद पवार यांनी मिलिंद एकबोटे यांना वाचवले हा प्रकाश आंबेडकरांचा आरोप बिनबुडाचा असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. शरद पवार कधीच कोणत्याही मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. शिवाय, १९९९ ते २००४च्या लोकशाही आघाडी सरकारमध्ये प्रकाश आंबेडकर सहभागी होते. त्या वेळी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता का, असा सवालही मलिक यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्या पक्षासोबत जावे हा त्यांचा अधिकार आहे. पण भाजपा, शिवसेना आणि पुरोगामी विचारांच्या पक्षापैकी आपला पहिला शत्रू कोण, हे त्यांना ठरवावे लागेल, असेही मलिक म्हणाले.