मुंबई : जिओ फायबरमुळे केबलचालकांना अस्वस्थ वाटने सहाजिक आहे. केबल चालकांनी कष्ट करून व्यवसाय उभे केले. ते असे उद्ध्वस्त होऊ देणार नाही. इंटरनेट फुकट वाटता, मग रेशनही फुकट वाटा. मोफत द्यायचे असेल 50 वर्षांचा करार करून मोफत सेवा वाटा. आहे का हिम्मत, असा सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
जिओ फायबरविरोधात मुंबईसह राज्यभरातील केबल मालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या केबल मालकांच्या संघटनेने बोलावलेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी रिलायन्सवर जोरदार टीका केली.
इंटरनेट सारख्या सेवा पहिल्यांदा फुकट वाटायच्या, काही महिन्यांत प्रतिस्पर्धी नामोहरम होऊन संपले की नंतर अव्वाच्या सव्वा दर वाढवायचे. मोफत द्यायचे असेल 50 वर्षांचा करार करून मोफत सेवा वाटा. शिवसेना केबलचालकांच्या पाठीशी राहणार. भाजी-भाकरी डिडिटली कशी देता येईल. लोकांच्या ताटातली भाजी-भाकरी काढून घेतल्यावर डिजिटलने पोट कसे भरेल. कोणाला व्यवसाय करण्यास आमचा विरोधा नाही. आणखी 10 जणांनी यावे पण कोणाच्या पोटावर पाय आणू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच आपण येथे भाषण द्यायला आलो नसून केबल मालकांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहणार असल्याचे सांगायला आलोय, असे आश्वासन उद्धव यांनी दिले. शिवसेना तुमच्यासारख्या सामान्यांवरील अन्यायासाठीच उभी राहीली आहे. यामुळे तुमच्यावरील अन्याय दूर करणारच. प्रत्येक गोष्ट आम्ही संघर्षातून मिळविणार आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.