Join us  

"आलो तर तुमचा नाहीतर समाजाचा"; कुटुंबाच्या प्रश्नावर जरांगे पाटलांचे पाणावले डोळे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 6:16 PM

राज्यात गेल्या ४ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे नाव खूप चर्चेत आलं असून राज्यातील सर्वच बडे नेते त्यांच्या भेटीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोहोचल्याचं दिसून आलं.

मुंबई/जालना - मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी गेल्या ७ दिवसांपासून उपोषणला बसलेले जरांगे पाटील अद्यापही आपली भूमिका ठाम ठेवली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यातील लाठीचार्ज संबंधित घटनेवरुन एसपींची बदली केली असून आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, उपपोषणस्थळी येणारे शिष्टमंडळ राज्यातील मराठा समाज बांधवाला आरक्षण दिल्याचा जीआर घेवून येईल, अशी आशा जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान, गेल्या ७ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनकाळात त्यांचं कुटुंबाशी एकदाही संभाषण झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं.  

राज्यात गेल्या ४ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे नाव खूप चर्चेत आलं असून राज्यातील सर्वच बडे नेते त्यांच्या भेटीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोहोचल्याचं दिसून आलं. तसेच, छत्रपती घराण्याचे दोन्ही वारसही येथे आले होते. शासनाच्या समोर जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मोठा प्रश्न आहे, तर राज्यभर सुरू असलेल्या मराठा आंदोलकांच्या तोंडातही जालना आणि जरांगे पाटील यांचंच नाव आहे. मात्र, जरांगे पाटलांचा हा संघर्ष गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. मराठा समाजासाठी मी स्वत:ला वाहून घेतल्याचं ते सांगतात. त्यामुळे, कुटुंबाकडेही दुर्लक्ष होतं. पण, त्यांनाही तेच सांगितलंय, असेही जरांगे पाटील म्हणाले. 

आलो तर तुमचा नाहीतर समाजाचा

मी माझं जीवन मराठा समाजासाठी अर्पण केलंय. २२ वर्षांपासून मी समाजाची सेवा करतोय. मला शब्दच रुढ पडून गेलाय, मराठा सेवक. मी समाजाची सेवा करणार, समाजच माझा मायबाप आहे, समाजालाच मी कुटुंब मानलंय, असे जरांगे पाटील यांनी म्हटलं. आंदोलन सुरू झाल्यापासून कुटुंबाशी बोललो नाही, कुटुंबाशी आपण बोललो तर मायेच्या मोहात जातो, तिथं गुतून जातो आणि समाजाला विसरुन जातो. तोपर्यंत कुटुंब त्यांच्यावरच आहे, जोपर्यंत मी समाजाचा आहे. मी कुटुंबाला हेच सांगतो की, मी आधी समजाचा आहे, नंतर तुमचा. आलो तर तुमचा नाही आलो तर समाजाचा, असे म्हणताना जरांगे पाटलांचे डोळे पाणावले होते. 

कुटुंबांशी कुठलाच संवाद नाही

माझं कुटुंब इथं आंदोलनस्थळी येत नाही, कारण कुटुंब डोळ्यसमोर दिसंल की माणूस मायेत गुंततो. त्यांनाही वाईट वाटतं माझ्याकडे बघून आणि मला ते दिसतं, म्हणून माझं कुटुंब इथं येत नाही. आंदोलनाच्या काळात एकदाही कुटुंबांशी बोलणं झालं नाही, फोनवरही नाही, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :मराठा आरक्षणजालनामुंबईमराठा