माझे सरकार असते तर ही वेळच आली नसती; अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 10:44 AM2024-01-04T10:44:30+5:302024-01-04T10:44:51+5:30
...पण ज्या देशाला घडविण्यास मदत करतात, अशा अंगणवाडी सेविकांना देण्यास पैसे नाहीत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली.
मुंबई : मी मुख्यमंत्री होतो तेव्हा तुमच्यासाठी फार काही करू शकलो नाही. पहिल्यांदा जगाला संकटात टाकणारा कोरोना आला. त्यानंतर माझे ऑपरेशन झाले. त्यातून बरा होतो तर सरकारच पाडले. माझे सरकार असते तर तुम्हाला इथे यावेच लागले नसते. सरकारला जाहिरातीवर कोट्यवधी उडवायला पैसे आहेत; पण ज्या देशाला घडविण्यास मदत करतात, अशा अंगणवाडी सेविकांना देण्यास पैसे नाहीत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली.
अंगणवाडी सेविकांच्या आझाद मैदान येथील आंदोलनातउद्धव ठाकरे सहभागी झाले. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गट तुमच्या पाठीशी आहे. शिवसैनिकांनीही या लढ्यात सहभागी व्हावे आणि न्याय मिळेपर्यंत थांबू नये, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. तुमची सेवा सरकारला कळतच नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
सरकारवर खरपूस टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारवर खरपूस टीका केली. ते म्हणाले की, मंत्री गुटगुटीत दिसतात. अनेक कुपोषित बालके आहेत. माता पण कुपोषित आहेत. त्यांची सेवा तुम्ही करता. ग्रामीण भागात तर आयुष्याचा श्रीगणेशा आंगणवाडीच्या शाळेत होतो. देशभर रेल्वेस्थानकांवर सेल्फी पॉईंट तयार केले. एका सेल्फी पॉईंटला साडेसहा लाखांचा खर्च केला आहे. सरकारच्या जाहिरातीचे पैसे जनता भरते अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.