कारसेवक नसते तर आज राम मंदिर उभं राहिलं नसतं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 10:35 AM2024-01-13T10:35:06+5:302024-01-13T10:36:43+5:30
राजकारण न आणता नाशिकच्या कार्यक्रमासाठी आम्ही राष्ट्रपतींना जाहीर आमंत्रण देत आहोत. त्यासोबत रितसर खासदारांचे शिष्टमंडळ भेटून राष्ट्रपती मुर्मू यांना निमंत्रण देत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबई - Uddhav Thackeray on Ram Mandir ( Marathi News ) राम मंदिराचे उद्घाटन करताय देशात सर्वत्र दिवाळी साजरी झाली पाहिजे असं म्हणता परंतु गेल्या १० वर्षात देशाचे दिवाळे निघालंय त्यावरही चर्चा करा. मी देशभक्त आहे. अंधभक्त नाही. राम मंदिर लोकार्पण होताना दिवाळी साजरी व्हायला हवी. त्यासाठी आम्ही नाशिकला चाललोय. कारसेवकांचे योगदान मोठे आहे. कारसेवकांनी धाडस केले नसते तर आज मंदिर उभं राहिले नसते. झेंडे लावायला अनेक येतात पण लढण्याची वेळ येते तेव्हा आपण कुठे होतो याचे उत्तर आज या लोकांकडे नाही. राम मंदिर हा मुद्दा आमच्यामुळे पुन्हा चर्चेत आला. पहले मंदिर फिर सरकार अशी घोषणा मी दिली होती. शिवजन्मभूमीची माती घेऊन मी अयोध्येला गेलो होतो त्यानंतर एका वर्षात कोर्टाचा निकाल आला. राम मंदिर कुणाची खासगी मालमत्ता नाही. जेव्हा माझ्या मनाला वाटेल तेव्हा रामाच्या दर्शनासाठी मी जाईल अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, २२ जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहोत. गोदाकाठी महाआरतीही करणार आहोत. २२ तारखेला अयोध्येत जे राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. ही प्राणप्रतिष्ठा केवळ प्रभू श्री रामाची नाही तर आपल्या राष्ट्राचीच ती प्राणप्रतिष्ठा आहे अशी आमची भावना आहे. अनेकांना माहिती नसेल परंतु राम मंदिराप्रमाणे सोमनाथ मंदिराचाही विध्वंस अनेकदा केला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेत ते मंदिर पुन्हा उभारले. पण प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेला वल्लभभाई नव्हते, त्यांचे निधन झाले होते. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सोमनाथ मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली होती.अयोध्येबाबतही वर्षोनुवर्ष जो लढा सुरू होता त्याला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला त्या अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेला राष्ट्रपतींना आमंत्रित करायला हवं होते. मात्र त्यांनी ते केले नाही. परंतु आम्ही नाशिकला काळा राम मंदिरात जाणार आहोत. त्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण देत आहोत. आम्ही कुठलेही राजकारण न आणता नाशिकच्या कार्यक्रमासाठी आम्ही राष्ट्रपतींना जाहीर आमंत्रण देत आहोत. त्यासोबत रितसर खासदारांचे शिष्टमंडळ भेटून राष्ट्रपती मुर्मू यांना निमंत्रण देत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच शंकराचार्यांनी राम मंदिराच्या सोहळ्याविषयी त्यांची भूमिका मांडली. जर आपण हिंदू धर्म पाळत असू तर ज्याचं काम त्यांनीच केले पाहिजे. राजकारणी लोकांनी बाजूला बसले पाहिजे. जर राम मंदिर हा राष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असेल तर राष्ट्रपतींनी प्राणप्रतिष्ठा करायला पाहिजे. मी पंडित नाही. मी कडवट हिंदू आणि हिंदुत्ववादी आहे. राम मंदिर व्हावे ही लाखो करोडो हिंदूची भावना आहे तशी माझीदेखील आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान आणि शिवसेनाप्रमुखांची भूमिका जनतेला माहिती आहे त्यामुळे यातील शास्त्राचे मुद्दे त्यावर मी बोलणार नाही. जर शंकराचार्यांनी काही शास्त्रपद्धतीने मुद्दे उपस्थित केले असतील तर त्यावर न्यासाने आणि ट्रस्टने विचार करावा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
दरम्यान, राम मंदिरात रामाची मूर्ती असेल की नाही याची शंका वाटते. अटल सेतूचे उद्घाटन केले परंतु अटलबिहारींचा फोटोच लावला नाही. प्रभू रामचंद्र दशरथ राजाचे पुत्र होते. राम वनवासात जाताना सहकुटुंब वनवासात गेले. सीताहरण झाल्यानंतर रामायण घडलं. गद्दारांची घराणेशाही यावर पंतप्रधान मोदी बोलले नाही. ती घराणेशाही त्यांना प्रिय आहे. परंतु घराणेशाहीबद्दल घरंदाज लोकांनी बोलायला हवं अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.