मुंबई - राज्यातील आरोग्य विभागाच्या गट क व ड प्रवर्गातील परीक्षा घेण्याबाबत संबंधित कंपनीने अमसर्थता दर्शवल्याने पर्याय नव्हता. कंपनीने 8 दिवसांचा कालावधी मागितला होता. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी रात्री उशिरा चर्चा झाल्यानंतरच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिले. मात्र, विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियातून संताप व्यक्त होत आहे. तर, विरोधकही सरकारवर निशाणा साधत आहेत. आमदार नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर बोचरी टीका केलीय.
राज्यात शनिवारी सकाळी परीक्षा होणार होती. विद्यार्थी परीक्षेची तयारी करत होते. त्याचवेळी शुक्रवारी रात्री परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. तर, अनेक परीक्षार्थींनी गाव सोडून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी प्रवासाला सुरुवात केली होती. काहीजण जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचलेही होते. मात्र, ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने हिरमोड होऊन त्यांना परतावे लागले. त्यावरुन, विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आमदार नितेश राणेंनी ट्विट करुन व्हिडिओ शेअर करत सरकारला सवाल केला आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षा देण्यासाठी येणारे विद्यार्थी लांबून स्वखर्चाने आले होते जर यांची आडनावे ठाकरे पवार आणि थोरात असती तर त्यांच्याबाबत असं झालं असतं का? ही मंत्र्यांची पोरं असती तर असं झालं असतं का? असा सवालही आमदार राणेंनी उपस्थित केला आहे.
परीक्षा रद्द नाही, पोस्टपोन झालीय
परीक्षा 100 टक्के होणारचं, परीक्षा रद्द झाली नसून ती पोस्टपोन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना जो मानसिक त्रास झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे. वास्तविक परीक्षांचा थेट संबंध आरोग्य विभागाशी नाही. आयटी विभागाने निवड केलेल्या कंपनीच्या अधिपत्याखालील हा विषय आहे. पण, आमच्या विभागातील नोकरीचा विषय असल्याने उद्या बैठक घेऊन आम्ही परीक्षेची तारीख निश्चित करू, असे राजेश टोपेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. माहिती व तंत्रज्ञान विभागाचा हा विषय आहे, कोणत्या कंपनीची निवड करायची हे तेच ठरवतात. त्यांनी निवड केलेल्या कंपन्यांचा हा विषय आहे, आरोग्य विभागाचा तसा संबंध नाही, असेही टोपेंनी म्हटले.
विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त
राज्यात शनिवारी सकाळी परीक्षा होणार होती. विद्यार्थी परीक्षेची तयारी करत होते. त्याचवेळी शुक्रवारी रात्री परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. तर, अनेक परीक्षार्थींनी गाव सोडून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी प्रवासाला सुरुवात केली होती. काहीजण जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचलेही होते. मात्र, ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने हिरमोड होऊन त्यांना परतावे लागले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा हा खर्च फुकटच वाया गेला आहे. सोशल मीडियातून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या ट्विटरवरही अनेकांनी उद्विग्न होऊन प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने तर, गरीबाचं लेकरू 500 रुपये घेऊन परीक्षाला जातंय, तिकडं माय 150 रुपये रोजानं शेतात जाती, असे म्हणत परीक्षा रद्द झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकमतशी बोलताना म्हटले, गट-क आणि गट-ड अशा ६२०५ जागा भरण्यासाठी मंत्रीमंडळाने मान्यता दिली होती. या जागा भरत असताना त्यासाठी परीक्षा घेण्याचे काम बाह्य संस्थेला देण्यात आले होते. या परीक्षेसाठी अंदाजे ८ लाख परीक्षार्थींनी नाव नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ही देण्यात आले होते. मात्र, या ज्ञासा संस्थेने आपल्याला परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी आणखी थोडा कालावधी लागेल, असे कारण पुढे केल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी लागली. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्य मंत्री टोपे म्हणाले.