- चेतन ननावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहरासह उपनगरात भाडे नाकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात धडक कारवाईची मोहीम परिवहन आयुक्त विभागाने बुधवारपासून सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत वारंवार भाडे नाकारणाऱ्या आणि जादा भाडे आकारणाºया वाहन चालकांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. त्यासाठी परिवहन विभागाने मुंबईत विशेष १२ पथकांची नेमणूक केल्याची माहिती राज्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी ‘लोकमत’ला दिली.
आयुक्त चन्ने यांनी सांगितले की, मुंबईतील आॅटो रिक्षा तपासणी मोहिमेत बुधवारी एकूण २०९ वाहने दोषी आढळली. त्यात भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे, जादा प्रवाशांची वाहतूक करणे, विना परवाना किंवा बिल्ला नसताना वाहन चालविणे अशा प्रकारे विविध नियम तोडल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. यात १२ रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या असून, ९३ रिक्षा चालकांचे परवाने जप्त करण्यात आले.
रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी भाडे नाकारण्याच्या अनेक तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्या होत्या. बहुतांश पर्यटकांना प्रवासासाठी रिक्षा, टॅक्सी हे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्याकडून भाडे नाकारणे किंवा जादा भाडे आकारल्याने मुंबईची प्रतिमा मलिन होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यासाठीच मोहीम हाती घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या मोहिमेअंतर्गत सातत्याने कारवाई करण्यात येईल. रोज वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकाणी पथके कारवाई करतील, असे आयुक्तांनी सांगितले.रिक्षा, टॅक्सी चालकांना बाजू मांडण्याची संधीभाडे नाकारल्यानंतर रिक्षा किंवा टॅक्सी चालकाचा वाहन चालक परवाना जप्त केला जाईल. मात्र त्याला आयुक्तांसमोर बाजू मांडण्याची संधीही दिली जाईल. भाडे नाकारण्यामागे खरेच महत्त्वाचे आणि योग्य कारण आढळल्यास त्याचा परवाना रद्द केला जाणार नाही. सध्या भाडे नाकारणाºया चालकांवर प्रथम ९० दिवसांसाठी परवाना रद्द करण्याची शिक्षा आहे.१० महिन्यांत तब्बल ५,०७१ तक्रारींची नोंदप्रादेशिक परिवहन विभागाच्या ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरीवली अशा चार कार्यालयांत १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत भाडे नाकारणे, उद्धट वर्तन, जादा प्रवासी, मीटर सिल ब्रोकन, बिल्ला नसणे, विना गणवेश अशा विविध गुन्ह्यांच्या एकूण ३ हजार ९९८ तक्रारी नोंदविण्यात आल्या. याउलट १ एप्रिल २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या १० महिन्यांच्या कालावधीतच याच प्रकरणी तब्बल ५ हजार ०७१ तक्रारींची नोंद झाली आहे. रिक्षा आणि टॅक्सींविरोधातील तक्रारींत तब्बल २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याची नोंद आहे