Join us

मॉल उघडू शकतात तर मंदिरे का नाही?, राज ठाकरे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 5:13 AM

मंदिरांसाठी भाजप, मनसे, वंचितने आग्रही भूमिका घेतली असताना शिवसेनेने मात्र मंदिरे उघडण्याची मागणी करणाऱ्यांनी थोडा संयम बाळगावा, असे आवाहन केले.

मुंबई : योग्य खबरदारी घेऊन राज्यातील मॉल्स उघडू शकतात तर मंदिरे का नाही, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तर, मंदिरांसाठी पंढरपुरात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. मंदिरांसाठी भाजप, मनसे, वंचितने आग्रही भूमिका घेतली असताना शिवसेनेने मात्र मंदिरे उघडण्याची मागणी करणाऱ्यांनी थोडा संयम बाळगावा, असे आवाहन केले.मंदिरे सुरू करण्यासंदर्भात त्र्यंबकेश्वरच्या पुजाºयांच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज्यात लॉकडाउन जाहीर झाल्यापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून मंदिरे बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय सरकारने घेतला. मात्र आता आॅगस्ट महिना उजाडला आहे. अशात हळूहळू अनलॉकच्या दिशेने आपण जात असताना मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे? योग्य खबरदारी घेऊन जर मॉल्स उघडले जाऊ शकतात, दुकाने उघडली जाऊ शकतात तर मंदिरे का उघडण्यात येत नाहीत, असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला.यापूर्वी भाजपने मंदिरे उघडण्यासाठी थेट राज्यपालांना निवेदन दिले होते. तर अलीकडेच राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनीही मंदिरे उघडण्याची भूमिका मांडली होती. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मात्र सबुरीचा इशारा दिला आहे. मंदिरे उघडल्यावर संक्रमण वाढल्यावर पुन्हा दोष तुम्ही सरकारला देणार. त्यामुळे मंदिरे उघडण्याची मागणी करणाºयांनी थोडा संयम बाळगावा, असे आवाहन राऊत यांनी केले.

 

टॅग्स :राज ठाकरे