सीमा महांगडेमुंबई : महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी नावाच्या पाट्या मराठीतच लागल्या पाहिजेत. त्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे. मात्र, मराठी शाळांचे काय? त्याच शाळाच टिकल्या नाहीत तर दुकाने, रस्ते, चौकातील मराठी पाट्या कशा वाचता येतील? असा खडा सवाल या मोहिमेच्या सदिच्छादूत अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी केला आहे. मराठी शाळा संघटनांनी पाट्यांच्या निमित्ताने शाळांच्या स्थितीकडे लक्ष वेधले आहे.
मराठी पाट्यांचा निर्णय व्हायलाच हवा होता. पण मराठी शाळांचा विषय जास्त महत्त्वाचा आहे. इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढतेच आहे. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत गेल्या १० वर्षांतील मराठी शाळांची आकडेवारी भविष्यातील पिढी मराठी पाट्या आणि देवनागरी लिपी तरी वाचू शकेल का? असा सवाल चिन्मयी यांनी केला आहे.
१३० मराठी शाळा बंद पडल्या
दशकभरात पालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली आहे. १३० मराठी शाळा बंद पडल्या, तर विद्यार्थ्यांची संख्या ६५ टक्क्यांनी घटली. २०१०-११ पासून मराठी माध्यमाच्या शाळांतील पटसंख्या ६७,०३३ ने घसरली आहे. राजकीय पक्षांनी मराठीची कास धरून निवडणुका जिंकल्या. मग मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले का उचलले नाहीत, असे चिन्मयी यांनी स्पष्ट केले.
निर्णयाचे स्वागत मात्र, मराठी शाळा हा मराठी भाषेचा कणा आहे. त्या टिकल्या तरच मराठी टिकेल. राज्यात मराठी शाळांना मान्यता मिळत नाही. वषार्नुवर्षे त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. मुंबईत आहे त्या शाळांचे इंग्रजीकरण सुरू आहे. मराठी शाळेत शिकलेल्यांना नोकरी नाकारली जाते. नाहीतर पाट्या असतील पण त्या वाचणारे नसतील.- सुशील शेजुळे, समन्वयक, मराठी शाळा संस्थाचालक संघ महाराष्ट्र.