मास्क घातला नाही तर रस्ता स्वच्छ करावा लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 05:36 PM2020-10-28T17:36:55+5:302020-10-28T17:37:46+5:30
Corona News : के पश्चिम वॉर्डमध्ये अभिनव संकल्पना
मनोहर कुंभेजकर
मुंबई: आता मास्क घातला नाही तर याद राखा झाडूने चक्क रस्ता स्वच्छ करावा लागणार आहे. मुंबईतील अश्या प्रकारे के पश्चिम वॉर्ड मध्ये राबाबवण्यात येत असलेली पहिली अभिनव संकल्पना आहे. ही अभिनव संकल्पना पश्चिम उपनगराचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची असून के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी गेल्या सात दिवसांपासून येथे राबवली आहे. या संकल्पनेचे येथील नागरिकांनी स्वागत केले असून यामुळे आता तरी नागरिक मास्क घालतील अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली.
पश्चिम उपनगरात जरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी,अजूनही बरेच नागरिक,तरुणाई आणि फेरीवाले मास्क घालत नाही.त्यामुळे हवेत त्यांच्या तोंडातील तुषार उडून कोरोनाचा प्रादुर्भाव होतो.त्यामुळे मास्क घालत नसलेल्या नागरिकांकडून मुंबई महानगर पालिका 200 रुपये दंड वसूल करते.जर नागरिक 200 रुपये दंडाची रक्कम भरू शकत नसतील तर त्यांच्याकडून आता चक्क सुमारे एक तास झाडूने रस्ता स्वच्छ करून घेतला जातो.
पश्चिम उपनगराचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची ही अभिनव संकल्पना के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशन परिसर,जेव्हीपीडी या ठिकाणी गेल्या सात दिवसांपासून राबवण्यास सुरवात केली आहे.रोज मास्क घालत नसलेल्या नागरिकांनी 200 रुपये दंड भरला नाही तर,आम्ही चक्क त्यांच्या हातात झाडू देतो, आणि आमच्या संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना एक तास रस्ता स्वच्छ करायला लावतो.रोज किमान दंड भरू शकत नसलेले विना मास्क 5 ते 6 नागरिक आम्हाला आढळून येतात,आणि त्यांच्याकडून रस्ता आम्ही स्वच्छ करून घेतो अशी माहिती मोटे यांनी लोकमतला दिली.
आज सकाळी जेव्हीपिडी रोडवर कपासवाडी जवळ विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी 3 जणांना विनामास्क बाबत दंड आकारण्यात आला आहे. सदर वेळी दंडाची रक्कम जमा करू शकले नाहीत अशा लोकांना जवळपास एक तास रस्ता सफाई साठी झाडु मारुन घेऊन समज देऊन सोडून दिले अशी माहिती विश्वास मोटे यांनी दिली.
विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली के पश्चिम वॉर्ड मध्ये आता पर्यंत गेल्या एप्रिल पासून मास्क घालत नसलेल्या सुमारे 8000 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन खात्याचे 25 कनिष्ठ पर्यंवेक्षक व दंडात्मक करवाई करणारे 30 मार्शल सहभागी आहेत.तर गेल्या 7 दिवसांपासून मास्क घालत नसलेल्या आणि 200 रुपये दंडाची रक्कम भरत नसलेल्या किमान 5 नागरिकांकडून तरी आम्ही रस्ता स्वच्छ करून घेतो अशी माहिती के पश्चिम वॉर्डचे घनकचरा व्यवस्थापनाचे सहाय्यक अभियंता धिरज बांगर यांनी लोकमतला दिली.
11 मार्च रोजी अंधेरी पश्चिम भवन्स परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाला. गेल्या एप्रिल,मे,जून मध्ये के पश्चिम वॉर्ड हा कोरोनाचा हॉट स्पॉट होता.मात्र गेली आठ महिने अविरत मेहनत करून आणि विविध प्रभावी उपाययोजना राबवून पूर्वी हॉट स्पॉट असलेला के पश्चिम वॉर्डमध्ये मोटे यांनी कोरोना नियंत्रणात आणला आहे अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना पालिकेच्या 24 वॉर्ड मध्ये पालिका प्रशासन प्रभावीपणे राबवत आहे. सदर संकल्पना यशस्वी कऱण्यात शिवसेनेचे विभागप्रमुख,नगरसेवक,आमदार,पदाधिकारी यांचा देखिल मोठा वाटा आहे.या सर्वांचे फलीत म्हणून आता मुंबईतील कोरोना आता बऱ्यापैकी नियंत्रणात आहे अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते,आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांनी लोकमतला दिली. मात्र जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत प्रत्येकाने मास्क लावणे,सतत हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टनसिंगचे पालन केल्यास कोरोनावर आपण निश्चित मात करू अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.