Join us

विधिमंडळ सदस्यांना मताचा अधिकार नाकारला जात असेल, तर लोकशाहीला टाळे लावा- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 9:52 AM

अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची परवानगी न्यायालयाने नाकरल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. राज्यसभेनंतर आता विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठीही पुन्हा एक मोठा धक्का मानला जात आहे. 

अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची परवानगी न्यायालयाने नाकरल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेचे निवडून येणारे सदस्य हे विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. अशावेळी विधिमंडळ सदस्यांना जर मताचा अधिकार नाकारला जात असेल तर संसदीय लोकशाहीला टाळे लावा, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. 

तत्पूर्वी, विधान परिषदेच्या निवडणूकीत चमत्कार कोणाच्या बाजूने घडेल, हे महाराष्ट्र सोमवारी बघेल. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील, त्यांची विकेट जाईल, असं विधान करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषद निवडणुकीची उत्कंठा आणखीच वाढविली. या बैठकांना जोर आला असून, चारही मोठ्या पक्षांचे आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. 

क्रॉसव्होटिंग होणार नाही याची दक्षता घेतानाच लहान पक्ष व अपक्षांची मते वळविण्यासाठी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. अर्थपूर्ण हालचाली मोठ्या प्रमाणात घडत असल्याची चर्चा आहे. २० जूनला होणाऱ्या निवडणुकीत दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात असून, एका उमेदवाराची विकेट निश्चित आहे. भाजपाचे आमदार ताज प्रेसिडेन्सी, काँग्रेसचे आमदार फोर सीझन, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ट्रायडंट व शिवसेनेचे आमदार वेस्टिन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. 

शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे उमेदवारांचा कोटा ठरवणार-

महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कल आहे. राज्यसभेत बसलेल्या फटक्यानंतर महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेतला आहे. शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे उमेदवारांचा कोटा ठरवणार असल्याची माहिती समोर येत आहे. दगाफटका होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे कोटा ठरवणार आहेत. तसेच महाविकास आघाडीची एकजूट आहे. कुठल्याही प्रकारची अडचण नाही, असा निर्वाळा अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 

यांचे पत्ते उघड नाहीत-

तीन आमदार असलेली बहुजन विकास आघाडी व प्रत्येकी २ मते असलेले एमआयएम व समाजवादी या पक्षांनी अद्याप पत्ते उघड केलेले नाहीत. राज्यसभेत एमआयएमने काँग्रेसला, तर सपाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता.

टॅग्स :संजय राऊतनवाब मलिकअनिल देशमुखन्यायालयविधान परिषद निवडणूक