५० लीटरपेक्षा जास्त खाद्यतेल वापरल्यास द्यावा लागेल हिशेब
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 06:14 AM2019-02-19T06:14:50+5:302019-02-19T06:15:17+5:30
एफडीएचा इशारा : अन्यथा कारवाईला जावे लागणार सामोरे
मुंबई : छोट्या उद्योग-व्यवसायामध्ये खाद्यतेलात पाच ते सहा वेळा पदार्थ तळले जातात, परंतु एखाद्या खाद्यतेलामध्ये पदार्थ तीनपेक्षा जास्त वेळा तळले, तर त्यामध्ये टोटल पोलर कंम्पाउंड (टीपीसी) हा घटक २५ टक्क्यांच्या वर जातो. टीपीसीचे प्रमाण जास्त वाढले, तर ते मानवी शरीराला घातक असते, हे लक्षात घेऊन आता मोठमोठ्या कंपन्यामध्ये ५० लीटरहून अधिक खाद्यतेल वापरले जात असल्यास, त्यांना दर दिवसाला किती तेल वापरले, कोणत्या पदार्थां(शाकाहारी/मांसाहारी)साठी खाद्यतेल वापरले इत्यादींचा हिशेब ठेवावा लागेल, अन्यथा एफडीएच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
पहिल्यांदा मोठ्या कंपनीतील लोक उरलेले खाद्यतेल फेरीवाल्यांना विकत होते. मात्र, आता हे खाद्यतेल बाहेर विकण्यास बंदी आहे. वापरलेल्या खाद्यतेलाचे बायोडिझेल कंपनी किंवा पर्यावरणाच्या नियमाप्रमाणे त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. एखादा खाद्यतेलात तीन वेळा पदार्थ तळून झाल्यावर त्या खाद्यतेलाचा पुनर्वापर न करता, त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. यासाठी एफएसएसएआय (फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस् आॅथॉरिटी आॅफ इंडिया) ने काही नियम आखून दिले आहेत. या नियमांची अंमलबाजवणी १ मार्चपासून करण्यात येणार आहे. सोबतच उत्पादनामध्ये मैदा किंवा गहू वापरला असेल, तर तसे उत्पादनावर नमूद करणे आता सक्तीचे ठरणार आहे.
काही उत्पादन कंपन्यांकडून गहू आणि मैदा दोन्ही एकत्र वापरून उत्पादन तयार केले जाते. आता एफएसएसएआयने सांगितल्याप्रमाणे, मैदा हा वेगळा आहे आणि गव्हाचे पीठ हे वेगळे आहे. त्यामुळे आता जी कंपनी बाजारात उत्पादन घेऊन येईल, तिला त्या उत्पादनावर मैदा किंवा गहू असे नमूद करणे सक्तीचे आहे. काही कंपन्या उत्पादनामध्ये मैदा वापरून त्यात गहू वापल्याचे सांगतात. बाजारात खूप सारे असे उत्पादन आहेत. एफएसएसएआयच्या नियमानुसार, जे लोक उत्पादन करतील त्यांनी मैदा वापरल्यावर उत्पादनावर मैदा लिहावे आणि ज्यांनी गहू पीठ वापरले, त्यांनी गव्हाचे पीठ असा उल्लेख करावा. मैदा हा शरीरासाठी चांगला नसतो. त्यामुळे उत्पादन घेताना ग्राहकांनी काळजीपूर्वक आणि तपासून उत्पादन घ्यावे, असेही पल्लवी दराडे यांनी सांगितले.
नियमांची अंमलबजावणी गरजेची
एखादा खाद्यतेलात तीन वेळा पदार्थ तळून झाल्यावर त्या खाद्यतेलाचा पुनर्वापर न करता, त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. यासाठी एफएसएसएआय (फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस् आॅथॉरिटी आॅफ इंडिया)ने काही नियम आखून दिले आहेत. या नियमांचे पालन न झाल्यास एफडीए प्रशासन कारवाई करणार आहे. १ मार्चपासून हा नियम अंमलात आणला जाणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली.