मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतू म्हणजेच सी-लिंकवर एका दुचारीस्वार महिलेनं गोंधळ घातला. वाहतूक पोलिसांनी तिला अडवलं असता महिलेनं अरेरावी सुरू केली आणि पोलिसाला शिवीगाळ देखील केली. याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वांद्रे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.
वाहतूक पोलिसांशी या महिलेनं विनाकारण वाद घातला. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. वाहतूक पोलिसानं गाडी बंद करायला सांगितली असता महिलेनं चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत धिंगाणा घातला. "पंतप्रधान मोदींनी फोन केला तरच मी गाडी बंद करेन, त्याशिवाय कुणाचं ऐकणार नाही", असं ती बरळताना व्हिडिओत दिसून येत आहे. इतकंच नव्हे तर तिनं वाहतूक पोलिसाला शिवीगाळ देखील केली. तसंच मारहाणीचीही धमकी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना वांद्रे-वरळी सी-लिंकच्या सुरक्षा रक्षकांच्या टीमकडून फोन आला. एक महिला सी-लिंकवर दुचाकी घेऊन आली असून ती वाद घालत असल्याचं कळवण्यात आलं. या महिलेचं नाव नुपूर मुकेश पटेल असं असून ती वांद्रे येथून दक्षिण मुंबईच्या दिशेनं जात होती.
"एका पोलिसानं जेव्हा तिला अडवलं तेव्हा ती वाद घालू लागली. आपल्याच बापाचा रस्ता आहे मला कुणी अडवू शकत नाही. अनेकदा विनंती करुनही तिनं दुचाकी रस्त्याच्या कडेला घेण्यास नकार दिला. इतकंच नाही तर वाहतूक पोलिसाला शिवीगाळ देखील केली", असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. संबंधित महिला ही मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील रहिवासी आहे. तिच्याविरोधात कलम ४१ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.