गरज पडल्यास केंद्र सरकारकडे शिफारस करु; शरद पवारांच्या सुरक्षेबाबत उदय सामंत यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 08:29 PM2023-06-09T20:29:04+5:302023-06-09T20:29:28+5:30

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राज्यातील अनेक नेते याचा निषेध करत आहे.

If necessary, make recommendations to the Central Government; Uday Samant's reaction regarding Sharad Pawar's security | गरज पडल्यास केंद्र सरकारकडे शिफारस करु; शरद पवारांच्या सुरक्षेबाबत उदय सामंत यांची प्रतिक्रिया

गरज पडल्यास केंद्र सरकारकडे शिफारस करु; शरद पवारांच्या सुरक्षेबाबत उदय सामंत यांची प्रतिक्रिया

googlenewsNext

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर विरोधकांनी कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका अज्ञात व्यक्तीने ट्विटच्या माध्यमातून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सौरभ पिंपळकर आणि राजकारण महाराष्ट्राचे या ट्विटर हँडलवरून पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह ट्विट करण्यात आले आहे. 

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राज्यातील अनेक नेते याचा निषेध करत आहे. तर धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. मंत्री उदय सामंत यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. शरद पवार यांच्या बद्दल नितांत आदर आहे. त्यांना संरक्षण देणे ही आमची जबाबदारी असून वाढीव संरक्षण द्यायची सरकारची तयारी असल्याचं देखील उदय सामंत यांनी सांगितलं. तसेच वेळ पडल्यास महाराष्ट्र शासन केंद्र सरकारकडे शरद पवारांच्या सुरक्षाबाबतीत शिफारस करेल, अशी माहिती देखील उदय सामंत यांनी यावेळी दिली. 

शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

धमक्या देऊन आवाज बंद करु शकत नाही- शरद पवार

कोणत्याही प्रश्नावर मत देण्याचा अधिकार या जनतेच्या प्रत्येक नागरिकाला आहे, असं असताना धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद कराल असे वाटत असेल तर हा गैरसमज असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे, त्यामुळे मला चिंता नाही. धमकीची मला कोणतीही चिंता नाही. मात्र कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांना देण्यात आली आहे, ज्यांच्यावर आहे, त्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

'गृहमंत्र्यांनी या धमक्यांची नोंद घ्यावी'

या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, गृहमंत्र्यांनी या धमक्यांची नोंद घ्यावी. ही जी धमकी आली हे दुर्देव आहे, एवढा द्वेश बरोबर नाही. सध्या राज्यात गुंडाराज सुरू आहे, हे संपूर्ण अॅडमिस्ट्रेशनचे फेल्युअर आहे. या ट्विटच्या काॅमेंटर वाचल्या एवढा द्वेश कुठून आला. या धमकीचा पाठपुरावा करुन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. 

Web Title: If necessary, make recommendations to the Central Government; Uday Samant's reaction regarding Sharad Pawar's security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.