गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांशी ‘झूम’द्वारे बोलणार - राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:07 AM2021-05-21T04:07:02+5:302021-05-21T04:07:02+5:30
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंधांमुळे मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण थांबले आहे. मात्र, अनेक निर्मात्यांनी परराज्यात आसरा ...
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंधांमुळे मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण थांबले आहे. मात्र, अनेक निर्मात्यांनी परराज्यात आसरा घेतला आहे. तिकडेच चित्रीकरण सुरू आहे. महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी लागणाऱ्या सुविधा अधिक असल्याने मुंबई, पुणे, नाशिक आदी भागांत चित्रीकरण करायला काहीच हरकत नाही, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर सध्याच्या कोरोना काळात ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्याचा आढावा आज राज ठाकरे यांनी घेतला. नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक जणांशी राज ठाकरे यांनी ‘झूम’वर चर्चा केली. त्यांच्या समस्या समजून घेतल्या. राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावे आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या. एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था, सध्या तयार असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी काय करता येईल या उपाययोजनांवरही चर्चा झाली.
दीड तास चाललेल्या या ‘झूम’ संवादात सर्व समस्या आणि मागण्या राज ठाकरे यांनी नोंदवून घेतल्या आणि यातील तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्र्यांशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. दोन दिवसांत या विषयांवर कार्यवाही होऊ शकेल, असा विश्वासही व्यक्त केला. गरज भासल्यास असाच ‘झूम’ संवाद मुख्यमंत्र्यांसोबत करण्याबाबत त्यांनी तयारी दर्शवली. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने या ‘झूम’ बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीला महेश मांजरेकर, केदार शिंदे, अंकुश चौधरी, लोकेश गुप्ते, सतीश राजवाडे, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, अमित फाळके, कौशल इनामदार, समित कक्कड, आदित्य सरपोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.