मुंबई: कोरोनाबाधित रुग्णसंख्येनुसार जिल्हा व प्रमुख महानगरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. त्यानूसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तसेच रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन कसा ठरवला जाणार यासंबंधित माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राजेश टोपे म्हणाले की, राज्यातील ज्या जिल्ह्यात १५ हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रेड झोन म्हणून ठरवण्यात येणार आहे. तर १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि २८ दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही तो ग्रीन झोन म्हणून ठरणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सुरुच राहणार असून तिथले निर्बंध आणखी कठोर केले जाणार आहे. तर ऑरेंज झोनमधल्या जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील. तिथले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येईल. वाहतुकीत सवलत देण्यात येईल. तर ग्रीन झोनमध्ये जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा मिळेल. ग्रीन झोनमधील निर्बंध टप्प्याटप्प्यानं हटवले जातील आणि जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय कारण राज्यात सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत. त्यासाठी आयसीएमआरच्या सूचना कटाक्षाने पाळल्या जात आहे. त्याचबरोबर घरोघर जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण देखील केले जात आहे. त्यासाठी ६३५९ पथके कार्यरत आहेत. कुठलीही तडजोड न करता सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.