ध्वनिप्रदूषण वेळीच कमी केले नाही तर आपण सगळे बहिरे होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 05:01 AM2021-03-04T05:01:10+5:302021-03-04T05:01:26+5:30

ज्या पद्धतीने वायुप्रदूषण कमी करण्यासाठी काम केले जात आहे, त्याच पद्धतीने आता ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी काम करण्याची गरज असून, यासाठी मुंबईकरांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन आवाज फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुल अली यांनी केले.

If noise pollution is not reduced in time, we will all be deaf | ध्वनिप्रदूषण वेळीच कमी केले नाही तर आपण सगळे बहिरे होणार

ध्वनिप्रदूषण वेळीच कमी केले नाही तर आपण सगळे बहिरे होणार

googlenewsNext

सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई असो, महाराष्ट्र असो वा देश असो; सर्वत्र ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण अत्यंत वाढते आहे. प्रत्येक ठिकाणी ध्वनिप्रदूषणाची मात्रा किंवा डेसिबलचे प्रमाण दुप्पट असून आवाजाचा वेग याच पद्धतीने वाढत राहिला तर आपण बहिरे होऊच; पण आपल्या पुढच्या पिढ्यांनाही याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ज्या पद्धतीने वायुप्रदूषण कमी करण्यासाठी काम केले जात आहे, त्याच पद्धतीने आता ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी काम करण्याची गरज असून, यासाठी मुंबईकरांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन आवाज फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुल अली यांनी केले. जागतिक श्रवण दिनानिमित्त ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सुमेरा बोलत होत्या.


ध्वनिप्रदूषण कसे आणि कुठे होते?
ध्वनिप्रदूषणाचा विचार करता, रहिवासी क्षेत्रामध्ये आवाजाची मर्यादा ही दिवसा पंचावन्न आहे, तर रात्री ही मर्यादा पंचेचाळीस आहे. येथे होणारे प्रदूषण याच्या दुप्पट आहे. वाहने असतील किंवा इतर प्रदूषणाचे घटक असतील; या प्रदूषणाच्या इतर घटकांमुळे आवाजाची नोंद शंभर डेसिबलच्या आसपास होत आहे. आवाज म्हटल्यानंतर केवळ वाहने असे नाही; तर ज्या ज्या घटकांमुळे आपल्या कानांना त्रास होतो, आपल्या मानसिकतेला त्रास होतो, अशा प्रत्येक घटकाचा यामध्ये समावेश होतो. नाही म्हटले तरी ध्वनिप्रदूषण हा एक आजार आहे आणि ती आरोग्याची समस्या आहे. त्यामुळे याबाबतीत वेळीच काम करणे गरजेचे आहे.


ध्वनिप्रदूषणाचा काय परिणाम होतो आहे ?
ध्वनिप्रदूषणाच्या त्रासाबाबत बोलावयाचे झाल्यास आज ज्या पद्धतीने ते होत आहे त्याच पद्धतीने चालू होत राहिले तर २०५० साली चारपैकी एक व्यक्ती कायमची बहिरी झालेली असेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दक्षिण आशियाचा विचार करता, येथे भारत असा देश आहे, जिथे सर्वाधिक ध्वनिप्रदूषणाची नोंद होत आहे. वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना होत असून, लहान मुलांनाही तो मोठ्या प्रमाणावर होत आहे. आपण बोलताना कोणत्याही एका समाजाबद्दल बोलत नाही. मात्र आपल्या प्रत्येक कृतीतून ध्वनिप्रदूषण होत असल्याचे निदर्शनास येते. सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो. आपण सातत्याने ध्वनिप्रदूषण करीत असतो. भारतात सातत्याने ध्वनिप्रदूषणाची मात्रा वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.


ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे का?
हो. मानसिकता बदलणे गरजेचे आहे. मुंबईकरांनी आपली मानसिकता बदलली आहे. गेल्या काही महिन्यांतील कार्यक्रम पाहिले तर निश्चितच ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण कमी झाले. आवाज फाउंडेशन हे मुंबई महापालिका, मुंबई पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकार यांच्यासोबत ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. प्रत्येक नागरिकाने थोडी तरी मदत केली तरी ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यास आपणास यश येईल.


ध्वनिप्रदूषण कमी करण्यास कसे काम केले जात आहे?
ध्वनिप्रदूषणाचा परिणाम जसा आपल्या आरोग्यावर होतो तसा तो आपल्या म्हणजे देशाच्या आर्थिक विकासदरावरही होत असतो. मुंबईचा विचार करता मुंबईकर आता ध्वनिप्रदूषणावर काम करीत आहेत. मागच्या काही महिन्यांपासून किंवा काही वर्षांपासून जे सण किंवा उत्सव साजरे होत आहेत, त्यांमध्ये गोंगाट होणार नाही याची काळजी घेतली जाते. मात्र हे पुरेसे नाही. ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका या दोघांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. कुठेतरी एखादा आवाज मोजणारा घटक बसविला म्हणजे काम झाले असे होत नाही. कृती कार्यक्रम आराखडा राबविला पाहिजे. ज्या ज्या आवाजामुळे त्रास होतो, ध्वनिप्रदूषण होते, अशा प्रत्येक आवाजावर बंधने घातली पाहिजेत. वाहनांचे आवाज कमी होतील याकडे लक्ष दिले पाहिजे. 

Web Title: If noise pollution is not reduced in time, we will all be deaf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.