मुंबई : ओला चालकाला डुलकी लागली, आणि कार थेट हाजी अलीच्या समुद्रातील खडकात पलटी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. सुदैवाने या अपघातात चालकासह चारही जण सुखरुप बचावले आहेत. हीच डुलकी या मित्रांच्या जिवावर बेतली असती. याप्रकरणी ओला चालकाला ताडदेव पोलिसांनी अटक केली आहे.नायगाव परिसरात आदित्य तावडे हा कुटुंबियांसोबत राहतो. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याची फेसबुकवरुन मध्यप्रदेशचा आकाश विश्वकर्मा आणि कोलकात्ताचा प्रितेश कंदोईसोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. बुधवारी रात्रीच्या सुमारास दोघेही मित्र मुंबईत आले. त्यांना मुंबई दर्शन करण्यासाठी ओला बुक केली. यावेळी माहिमचा रहिवासी असलेल्या ओला चालक मोहम्मद अब्दुल रशीद शेख (३५) तेथे दाखल झाला. त्याच्या ओला कारमधून त्यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. पुढे मुंबई दर्शन करुन पहाटे चारच्या सुमारास परतत असताना शेखला झोप आली.त्याला डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. तो हाजीअली परिसरातील दुभाजकाला धडकला. पलटी होत थेट हाजीअलीच्या समुद्रातील खडकात फसल्याने खळबळ उडाली. स्थानिकांच्या मदतीने चौघांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आले. या विचित्र अपघातातून चालकासह चौघे मित्र थोडक्यात बचावले. यात कारचा चुराडा झाला आहे. याप्रकरणी चालकाला निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती ताडदेव पोलिसांनी दिली.
...तर डुलकी जिवावर बेतली असती, ओला कार समुद्रात उलटली, ताडदेव येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 1:12 AM