मुंबई : कोस्टल रोड प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला, तर प्रकल्प हाणून पाडू, अशा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने दिला आहे. मुंबईकरांच्या सोयीसाठी मच्छीमारांचा प्रकल्पाला विरोध नाही. मात्र, अधिकारी मच्छीमारांशी चर्चा न करता, प्रकल्प रेटू पाहत असल्याचा आरोप करत, काम बंद पाडण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या परिषदेत तांडेल म्हणाले की, कोस्टल रोडला विरोध नसला, तरी मासेमारी व्यवसाय नष्ट होणार असेल, तर प्रकल्प होऊ देणार नाही. प्रकल्पाआधी महापालिकेने मच्छीमार सहकारी संस्थांसोबत चर्चा करणे अपेक्षित आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची चर्चा न करता, मच्छीमारांना मासेमारी करण्यापासून रोखत प्रशासनाने प्रियदर्शनी येथे समुद्रात भराव टाकण्याचे काम सुरू केले आहे. याच समुद्र किनारी चांगल्या प्रकारचे कोळंबी, जवळा, खेकडे, शेवंड, घोळ असे विविध प्रकारचे मासे मिळतात. मासळीच्या या जातीचे प्रजनन येथील खडकाळ भागात होते. मात्र, भराव टाकल्यानंतर उत्पादनाची जागाच नष्ट होणार असून, वरळीच्या मच्छीमारांचा व्यवसायच पूर्णपणे बंद होईल. अशीच काहीशी परिस्थिती चिंबई, वांद्रे, खार दांडा, जुहू, मोरेगाव येथील मच्छीमारांची आहे. म्हणूनच महापालिकेने चर्चेने प्रश्न सोडविण्याचे आवाहन समितीने केले आहे.महापालिका आयुक्तांना ७ दिवसांची मुदतकोस्टल रोड प्रकरणी महापालिका आयुक्त अजय मेहता यांना कृती समितीने सात दिवसांची मुदत दिली आहे.पालिकेने प्रकल्प मंजुरी देताना कोळीवाड्यांना आक्षेप नोंदविला नसल्याचा आरोपही समितीने केला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.
चर्चा न केल्यास कोस्टल रोड गुंडाळायला लावू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 6:45 AM