ईशान्यचा वाद मिटत नसेल तर आठवलेंना तिकीट द्या - आरपीआय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 06:59 PM2019-03-29T18:59:07+5:302019-03-29T19:36:49+5:30
ईशान्य मुंबईत शिवसेना भाजपाचा सुरू असलेला टोकाचा वाद मिटवायचा असेल तर ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावी अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे
मुंबई - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप यांचे एकमत होत नाही. या मतदारसंघात शिवसेना भाजपामध्ये टोकाचे वाद आहेत. हा वाद मिटविण्यासाठी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासाठी सोडावा अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर आणि मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे. मुंबईत आझाद मैदान येथील रिपाइंच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपाने मन मोठे करून रिपब्लिकन पक्षासाठी सोडल्यास संपूर्ण देशभरात चांगला संदेश जाईल. ईशान्य मुंबईत शिवसेनेचा किरीट सोमय्या यांना तीव्र विरोध आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या मतदारसंघात संभ्रम निर्माण झाला आहे. ईशान्य मुंबईत शिवसेना भाजपाचा सुरू असलेला टोकाचा वाद मिटवायचा असेल तर ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावी अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सुटल्यास या मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे निवडणूक लढतील त्याबाबत त्यांची तयारी असल्याचे अविनाश महातेकर आणि गौतम सोनवणे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत चर्चा केली असून भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीच्या प्रचाराला रिपब्लिकन पक्षाने सुरुवात केली आहे. तरी देखील ईशान्य मुंबई हा मतदारसंघ आंबेडकरी जनतेचा बालेकिल्ला आहे असंही अविनाश महातेकरांनी सांगितले.
Republican Party of India's Ramdas Athawale: We kept forward our wish to let me contest from Mumbai North-East constituency, but haven't received a positive response from BJP yet. Shiv Sena & BJP are having differences over this constituency, so I'm ready to contest from there pic.twitter.com/S1vp1YuJrK
— ANI (@ANI) March 29, 2019