लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू केल्यानंतर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत अंशतः वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात याबाबत आढावा घेऊन रुग्ण संख्या कमी असल्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मुंबईतील महाविद्यालय सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. २२ फेब्रुवारीआधी याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेने मुंबई विद्यापीठाला कळवले आहे.
मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र कोरोनाचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात येत असल्याने राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १५ फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना ५० टक्के रोटेशन पद्धतीने बोलविण्याची परवानगी महाविद्यालयांना दिली आहे. मात्र मुंबई महानगर प्रदेशात महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आहे.
१ फेब्रुवारीपासून मुंबईत सर्वांसाठी लोकलसेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात मुंबईतील बाधित रुग्ण संख्येत वाढ अथवा घट आहे का? याचा आढावा पालिका घेणार आहे. रुग्ण संख्या कमी असल्यास मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत चर्चा करून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय होईल. तशी माहिती २२ फेब्रुवारीपूर्वी कळविण्यात येईल, असे पालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांनी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांना पत्राद्वारे कळवले आहे.