मुंबई - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे बेकायदेशीर असल्याचा दावा करत शिवसेना पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर, दुसरीकडे सरकारला ६ महिने होऊन गेले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने आमदारांमध्ये खदखद व्यक्त होत आहे. मंत्रिपद कधी मिळणार, याकडे अनेक आमदार सहा महिन्यांपासून डोळे लावून बसले असले तरी सध्या तरी मंत्रिमंडळ विस्ताराची कोणतीही शक्यता नसल्याने शिंदे-फडणवीस गटांमध्ये काहीही नाराजीची चर्चा आहे. त्यावरुनच, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर आणि भाजप-शिंदेगटावर निशाणा साधला आहे.
नुकतेच शिंदे गटाकडून मंत्रिपद हुकलेले आमदार संजय शिरसाट यांनी २० ते २२ जानेवारीला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी तारीख जाहीर केली. मंत्रिमंडळ विस्तारात काही तांत्रिक अडचणी आहेत त्या १५ जानेवारीपर्यंत संपतील, असे त्यांनी सांगितले होते. भाजप आमदारांमध्ये मात्र या विषयावर मौनच आहे. सरकार व्यवस्थित चालले असून २०२४ अखेरपर्यंत ते व्यवस्थित चालेल, असेच त्यांच्याकडून सांगितले जात आहे. तसेच, सध्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याने यापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत खंत बोलून दाखवली होती. त्यानंतर, आता सुप्रिया सुळे यांनीही तोच मुद्दा पकडत शिंदे-फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
जर दोनच लोक मंत्रिमंडळाचा निर्णय घेणार असतील तर बाकी मंत्र्यांनी करायचं तरी काय?, असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये खूप कर्तुत्ववान महिला आहेत. पण, भाजपला महिलांबद्दल आदर नाही, हे त्यांच्या कृतीमधून दिसत आहे. जेव्हा पन्नास खोक्यांचे सरकार म्हणतात तेव्हा हा अपमान फक्त त्यांचा नसून संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. एक मंत्री ६ जिल्हे सांभळतो, तरी देखील काम होत नाहीत. त्यामुळे, सर्वसामान्याच्या परस्थितीला सरकारच जवाबदार आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला.