मुंबई – घटनाबाह्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांना लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मुंबईकर म्हणून टोल भरतोय. परंतु पश्चिम द्रुतगती, पूर्व द्रुतगती महामार्गावर खड्डे पडलेत. एकदा सेटलमेंट करून टोलनाके बंद करावेत. MSRDC चं रस्त्यावर काडीमात्र काम करत नाही. त्यामुळे हे टोल बंद करावेत. हे दोन हायवे बीएमसीकडे दुरुस्तीसाठी दिलेत. मग हे टोल का भरायचे असा सवाल माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईकर एक कर बीएमसीला देते मग टोलनाक्याच्या माध्यमातून दुसरा कर कशाला? मुंबईतील पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गाची देखभाल होत नसेल तर मग टोल कशाला घेताय? रस्त्यावर खड्डे असतील तर MSRDC टोल कशाला घेते? हे सरकार पडल्यानंतर आमचे नवीन सरकार येणार आहे. ज्यादिवशी सरकार येईल तेव्हा आम्ही टोल बंद करू असंही त्यांनी म्हटलं.
तसेच आम्ही जनहिताचे विषय मांडतोय, आज टोलनाक्यावर आंदोलन केले तर नुकसान जनतेचे होईल. त्यामुळे आम्हाला आंदोलन करायचे नाही. जर सरकारमध्ये हिंमत असेल तर कंत्राटदारांच्या विरोधात जाऊन हे टोलनाके बंद करावेत. जर नाही केले तर आमचे सरकार येणारच आहे त्यामुळे आम्ही हे टोलनाके बंद करू असंही आदित्य ठाकरेंनी सांगितले. तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणाकडे लक्षही दिले नाही. बेस्टचा आज स्थापना दिवस आहे. आम्ही इलेक्ट्रिक बसेस आणल्या होत्या. मात्र आता बेस्टची अवस्था पाहा. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठकही घेतली जात नाही असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
दरम्यान, वेस्टर्न, ईस्टर्न हायवेवरील देखभाल, रंगरंगोटी, सिग्नल यंत्रणेतील बिघाड, रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती हे सगळे बीएमसीच्या पैशातून होते. मग बीएमसी खर्च करत असेल तर आम्ही एमएसआरडीसीला टोल का द्यावा हा माझा खरा प्रश्न आहे. मुंबईकरांच्या पैशातून हा खर्च होत असतील मग अजूनही टोलनाके आहेत त्याचा पैसा MSRDC ला का जातोय? अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. हे रस्ते मुंबई महापालिकेला हस्तांतरित केले तर टोलनाके आणि त्यावरील जाहिरातीचे होर्डिंग्स यांचा महसूल राज्य सरकार का घेतंय? मुंबईकरांवर दुप्पट कर कशासाठी? सर्वात जास्त कर मुंबई देतेय. बेस्ट, रस्ते यांची अवस्था बिकट झालीय असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.