Sanjay Raut: पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त करायचं असेल तर देशभर भाजपाचा पराभव करावा लागेल; संजय राऊतांचा चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 11:25 AM2021-11-04T11:25:56+5:302021-11-04T11:26:22+5:30
Sanjay Ruat: देशातील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळेच केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले आहेत, असं संजय राऊत म्हणाले
मुंबई-
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पेट्रोलच्या दरात ५ रुपये आणि डिझेलच्या दरात १० रुपयांची कपात करुन जनतेला दिवाळी भेट दिली. पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार गेल्यामुळे भाजपा सरकारवर टीका केली जात असताना केंद्रानं इंधन दरात कपात करत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी मात्र मोदी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. देशातील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळेच केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले आहेत. मग ५० रुपयांनी पेट्रोल स्वस्त करायचं असेल तर आपल्याला आता संपूर्ण देशभर भाजपाचा पराभव करावा लागेल, असा चिमटा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काढला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
"केंद्रानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. पण ही दर कपात पोटनिवडणुकीतील भाजपाच्या पराभवाचं फलित आहे. आता ५ रुपयांची पेट्रोल स्वस्त झालंय. पण ५० रुपयांनी स्वस्त करायचं असेल तर आपल्याला संपूर्ण देशभर भाजपाचा पराभव करावा लागेल आणि २०२४ साली ते नक्कीच होईल", असं संजय राऊत म्हणाले.
भाजपा सरकार सडक्या मनाचं
"तुम्ही स्वत:ला मोठ्या मनाचे म्हणवून घेता. मग पेट्रोल फक्त ५ रुपयांनी स्वस्त करुन काय फायदा? हा तर जनतेचा अपमान आहे. पेट्रोल-डिझेल आज शंभरी पलिकडे आहे. तुम्ही खरंच मोठ्या मनाचे असता तर पेट्रोल-डिझेल २५ ते ३० रुपयांनी स्वस्त केलं असतं. तुम्ही मोठ्या नव्हे, तर सडक्या मनाचे आहात. दिवाळीच्या दिवशी असे शब्द वापरणं योग्य नाही. पण माझा नाईलाज आहे. आज दिवाळी असली तरी जनतेची दिवाळी झालेली नाही. जनता महागाईनं त्रस्त आहे", असं संजय राऊत म्हणाले.