लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिल्लीश्वरांच्या आदेशाने घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून मुंबईची लूट सुरू आहे. स्ट्रीट फर्निचर, रस्त्यांची कामे यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधील फरक मुख्यमंत्र्यांना कळत नाही, असा आरोप करत युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार केला.
एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले होते. त्यापार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप ही भाजपची स्क्रीप्ट आहे, ते मला घाबरतात म्हणून असे आरोप करतात, मी त्यांना आव्हान देतो ‘वन टू वन’ चर्चा करा, याला त्यांची तयारी नाही. पुन्हा, पुन्हा तेच आरोप करत मी जे आरोप करतोय त्यावर उत्तर देत नाहीत.
लोकायुक्तांना स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यासंबंधी आम्ही पुरावे दिले आहेत. फर्निचरचे काम थांबवूनही कंत्राटदाराला २५ कोटी रुपये देण्यात आले. ते कंत्राटदाराला का दिले? जुलैच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी लावतो, असे सांगितले; पण तसे झाले नाही, असे सांगत मुंबईची लूट आम्ही होऊ देणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
प्रत्येक महिन्यात मी रस्ते घोटाळ्याचीही माहिती समोर आणत असून यात घोटाळा झाल्याचे महापालिकेलाही मान्य करावे लागले. महापालिका रस्ते कंत्राटदारांना ६२५ कोटी रुपये आगाऊ देणार होते; पण माझ्या आरोपांमुळे ते पैसे वाचले. रस्त्यांच्या पहिल्या निविदेपेक्षा दुसरी निविदा ३०० कोटी रुपयांनी कमी आहे. याबाबत आयुक्तांकडे विचारणा केल्यावर त्यांनी अद्याप उत्तर दिली नसल्याचेही आदित्य म्हणाले.
स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याबाबत लोकायुक्त फेब्रुवारीत सुनावणी घेणार असून, आयुक्तांना उपस्थित रहाण्याचे आदेश दिले आहेत, तसेच मलासुद्धा बोलावले असल्याचे आदित्य यांनी सांगितले.