लालपरी बिघडल्यास कोणत्याही बसने जा - परिवहनमंत्री दिवाकर रावते
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 02:11 AM2019-09-08T02:11:40+5:302019-09-08T02:12:07+5:30
जादा भाडे न आकारता उच्च श्रेणीच्या पर्यायी बसने जाता येणार
मुंबई : एसटीचा रस्त्यात बिघाड झाल्याने प्रवासात खोळंबा होतो. अशावेळी पर्यायी बस उपलब्ध होईपर्यंत प्रवाशांना अनेक तास ताटकळत बसावे लागत होते. मात्र आता खोळंबा झालेल्या प्रवाशांसाठी पर्यायी बस म्हणून उच्च श्रेणीची बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. विशेष म्हणजे उच्च श्रेणीच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना मूळ तिकिटात प्रवास करता येईल. यासाठी कोणतेही जादा भाडे आकारले जाणार नाही. यासंदर्भातील परिपत्रक एस.टी. महामंडळाने शनिवारी जारी केले आहे.
एसटी बंद पडल्यास त्या बसमधील प्रवाशांना पुढील प्रवास त्याच प्रकारच्या बसमधून करणे अनिवार्य होते. उच्च श्रेणीच्या बसमधून प्रवास करण्यास जादा भाडे आकारले जात होते. अनेक वेळा एसटी बंद पडलेल्या ठिकाणाच्या आगारात पर्यायी बस नसल्याने प्रवाशांना अनेक तास ताटकळत उभे राहावे लागत होते. यातून प्रवाशांचे मानसिक खच्चीकरण आणि त्यांचा वेळ वाया जात होता.
हे लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीची सेवा ग्राहकाभिमुख करण्याच्या सूचना रावते यांनी एसटी प्रशासनाला दिल्या. यातून प्रवाशांना पर्यायी बस म्हणून उच्च श्रेणीच्या बस उपलब्ध होतील. याचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांसह सवलत पासधारकांना होईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.
प्रवाशांना दिलासा
एसटी बंद पडल्यास पुढील प्रवासासाठी उच्च श्रेणीच्या बस उपलब्ध होतील. विशेष म्हणजे त्यासाठी जादा भाडे आकारले जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांचा त्रास कमी होऊन वेळेचीही बचत होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.