प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यास एसी लोकल जलद मार्गावरूनही धावणार : महाव्यवस्थापक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 07:39 AM2021-02-06T07:39:42+5:302021-02-06T07:40:09+5:30
AC local : सध्या मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते सीएसएमटी दरम्यान सुरू असलेल्या एसी लोकल सेवेला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यास लवकरच एसी लोकलच्या फेऱ्या वाढतील
मुंबई : सध्या मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते सीएसएमटी दरम्यान सुरू असलेल्या एसी लोकल सेवेला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यास लवकरच एसी लोकलच्या फेऱ्या वाढतील. तर, कल्याण ते सीएसएमटी एसी लोकल प्रवास जलद मार्गावरून होईल, अशी माहिती शुक्रवारी रोजी मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक संजीव मित्तल यांनी दिली. तसेच या वर्षी मध्य रेल्वे मार्गावरील सरकते जिने, पादचारी पूल, लिफ्ट यांचीही संख्या वाढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना ठराविक वेळेची मर्यादा घालून उपनगरीय लोकल प्रवासात मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे एसी लोकलची प्रवासी संख्याही तीन टक्क्यांनी वाढली. त्यामुळे एसी लोकलची प्रवासी संख्या वाढल्यास आणि प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास सीएसएमटी-कल्याण दरम्यान जलद मार्गावर एसी लोकल सुरू करणार आहोत. वेळापत्रक बदलण्यास देखील पुढाकार घेतला जाणार आहे, अशी माहिती मित्तल यांनी दिली. १७ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेची दुसरी एसी लोकल सीएसएमटी ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर सुरू झाली आहे. दररोज या एसी लोकलच्या १० फेर्या होत आहेत. रेल्वे मार्गावर प्रथमच नागपूर विभागातून १३० किलोमीटर प्रतितास वेगाने ट्रेन धावणार आहे. इटारसी- नागपूर- बल्लारशा रेल्वे मार्गाची आरडीएसओच्या पथकाकडून नुकतीच पाहणी झाली आहे.