प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यास एसी लोकल जलद मार्गावरूनही धावणार - महाव्यवस्थापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:10 AM2021-02-06T04:10:54+5:302021-02-06T04:10:54+5:30

वर्षभरात सरकते जिने, पादचारी पूल, लिफ्टची संख्या वाढणार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सध्या मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ...

If the response of passengers increases, AC Local will also run on fast lanes - General Manager | प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यास एसी लोकल जलद मार्गावरूनही धावणार - महाव्यवस्थापक

प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यास एसी लोकल जलद मार्गावरूनही धावणार - महाव्यवस्थापक

Next

वर्षभरात सरकते जिने, पादचारी पूल, लिफ्टची संख्या वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्या मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते सीएसएमटीदरम्यान सुरू असलेल्या एसी लोकल सेवेला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यास लवकरच एसी लोकलच्या फेऱ्या वाढतील, तर कल्याण ते सीएसएमटी एसी लोकल प्रवास जलद मार्गावरून होईल, अशी माहिती शुक्रवारी मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक संजीव मित्तल यांनी दिली, तसेच यावर्षी मध्य रेल्वे मार्गावरील सरकते जिने, पादचारी पूल, लिफ्ट यांचीही संख्या वाढविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना ठराविक वेळेची मर्यादा घालून उपनगरीय लोकल प्रवासात मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे एसी लोकलची प्रवासी संख्याही तीन टक्क्यांनी वाढली. त्यामुळे एसी लोकलची प्रवासी संख्या वाढल्यास आणि प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास सीएसएमटी-कल्याणदरम्यान जलद मार्गावर एसी लोकल सुरू करणार आहोत. वेळापत्रक बदलण्यासदेखील पुढाकार घेतला जाणार आहे, अशी माहिती मित्तल यांनी दिली. १७ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेची दुसरी एसी लोकल सीएसएमटी ते कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर सुरू झाली आहे. दररोज या एसी लोकलच्या १० फेऱ्या होत आहेत.

रेल्वे मार्गावर प्रथमच नागपूर विभागातून १३० किलोमीटर प्रतितास वेगाने ट्रेन धावणार आहे. इटारसी- नागपूर- बल्लारशादरम्यान रेल्वे मार्गाची आरडीएसओच्या पथकाकडून नुकतीच पाहणी झाली आहे. याचा अहवाल येताच रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत १३० किलोमीटर प्रतितास वेगाने ट्रेनची ट्रायल घेतली जाणार असल्याची माहिती मित्तल यांनी दिली.

............................

Web Title: If the response of passengers increases, AC Local will also run on fast lanes - General Manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.