Join us

नदीकिनारी भिंत बांधली तर नदीचा जीव जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबईसह कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना महापूर आले आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. शिवाय ...

मुंबई : मुंबईसह कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना महापूर आले आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. शिवाय निसर्गाला फटका बसला तो वेगळाच. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नयेत, म्हणून नदीकिनारी भिंत बांधण्याच्या, सागरात भिंत बांधण्याच्या चर्चांना उधाण आले असले तरी पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या कार्यकर्त्यांनी नदीकिनारी भिंत बांधण्याला, सागरात भिंत बांधण्याला विरोध दर्शविला आहे. नदीकिनारी भिंत बांधली तर नदीचा जीव जाईल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.

वनशक्ती संस्थेचे संचालक डी. स्टॅलिन यांनी सांगितले की, नदीच्या किनारी भिंत बांधणे अयोग्य आहे. नैसर्गिकरित्या त्याचा निसर्गाला फटका बसतो. पावसाळ्यात नदीमध्ये पावसाचे पाणी भरते तेव्हा नदी फुगते. अशावेळी या पाण्याला जागा देणे गरजेचे असते. पाणी पसरण्यास जागी दिली पाहिजे. भिंत बांधली की पाण्याला बंधन राहील. पाणी तुंबून राहील. सरकारी यंत्रणांना भिंत बांधण्यात रस आहे, कारण यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करता येतात. मुंबईत जेव्हा पूर आले तेव्हा सगळ्या खाड्यांना भिंती बांधून हे लोक मोकळे झाले. एवढे करूनही पूरस्थिती कमी झाली नाही.

पर्यावरणाचे अभ्यासक झोरू बाथेना म्हणाले की, आपण दोन गोष्टी बघितल्या पाहिजेत. एक म्हणजे आपण नैसर्गिक घटक लक्षात घेतले पाहिजेत. नदीत पाणी वाढते तेव्हा ते साहजिकच आजुबाजूच्या परिसरात पसरते आणि हे नैसर्गिक आहे. मिठी नदी आरेतून जाते आणि आरेमध्ये जी भिंत बांधण्यात आली आहे ते चूक आहे. कारण मिठी नदीमधील पाणी आरेमध्ये गेलेच पाहिजे. समजा नदीच्या दहा किलोमीटर किनाऱ्यावर बांधकाम आहे म्हणून दहा किलोमीटर भिंत बांधणे योग्य नाही. मग ती नदी ही नदी राहत नाही तर तिचा नाला होताे. मात्र, याच दहा किलोमीटरमध्ये एखादी इमारत असेल आणि त्या इमारतीला पुराच्या पाण्याचा फटका बसत असेल तर तेथे भिंत बांधता येऊ शकते.

किती भिंती बांधणार?

आजच्या क्षणाला नदीच्या पात्रात जाऊनदेखील बांधकाम करता येईल, अशी अवस्था आहे. असे होता कामा नये. धोका वाढत आहे. वर्षोनुवर्षे हे वाढत जाणार आहे. पाऊसदेखील वाढत जाणार. त्यामुळे आपण किती भिंती बांधणार? हा प्रश्नच आहे. आता तर समुद्रात भिंत बांधणार, असे म्हणत आहेत. यावर आता काय बोलणार? हा प्रश्नच आहे, असेही दयानंद स्टॅलिन यांनी सांगितले.