मुंबई - केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना संगमेश्वर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर, राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्याचं दिसून आलं. भाजप नेते आणि जनआशीर्वाद यात्रेचे कोकणातील समन्वयक प्रमोद जठार यांनी राणेंच्या अटकेनंतर छत्रपती संभाजी महाराजांशी त्यांची तुलना केली होती. संभाजी महाराजांनाही संगमेश्वरमध्ये अटक झाल्याची आठवण जठार यांनी सांगितली. त्यावरुन, राष्ट्रवादीच्या आमदाराने ट्विट करुन जठार यांच्यावर प्रहार केला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा दाखल देत नारायण राणेंच्या अटकेची तुलना प्रमोद जठार यांनी केली. त्यानंतर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जठार यांच्यावर टीका केली. कुठे छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे नारायण राणे, काहीही बोलायचे, असे त्यांनी म्हटलं होतं. आता, आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करुन जठार यांच्यावर निशाणा साधला. तसेच, राणे कुटुंबीयांवरही प्रहार केला आहे.
काय म्हणाले होते जठार
जनआशीर्वाद यात्रेचे परिवर्तन आता आंदोलनात झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत नारायण राणेंची सुटका होत नाही तोपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात भाजपा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. सरकारने एक लक्षात घ्यावे छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली आणि औरंगजेबाचे सरकार संपले होते. त्यामुळे या सरकारचे थडगं या महाराष्ट्रात उभं केल्याशिवाय भाजपा राहणार नाही, असे प्रमोद जठार यांनी म्हटले होते. यावरून अंजली दमानिया यांनी ट्विट करत प्रमोद जठार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.