लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरमध्ये शाळा प्रत्यक्षात सुरू केल्यास देशातील ५३ टक्के पालक मुलांना शाळेत पाठविण्यासाठी तयार आहेत, तर ४४ टक्के पालक मुलांना शाळांत पाठविण्यासाठी अद्याप साशंक असल्याची माहिती लोकल सर्कल या ऑनलाईन सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेच्या देशव्यापी सर्वेक्षणातून समोर आली आहे.
जवळपास १० हजार पालकांच्या सर्वेक्षणातून काढलेल्या निष्कर्षानुसार २१ टक्के पालकांनी १५ ऑगस्टपासून शाळा सुरू कराव्यात, असे मत नोंदविले, तर १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष पद्धतीने वर्ग सुरू करण्याला १५ टक्के आणि १५ सप्टेंबरपासून ऑफलाईन वर्गाना ६ टक्के पालकांनी सहमती दर्शविली आहे. ९ टक्के पालकांनी मुलांच्या शाळा सुरू असून ते मुलांना शाळेत पाठवीत असल्याची माहिती दिली.
‘लोकल सर्कल’च्या आधीच्या सर्वेक्षणात जून २०२१मध्ये ७६ टक्के पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नव्हते, तर जुलैमध्ये ४८ टक्के आणि ऑगस्टमध्ये ४४ टक्के पालक मुलांना शाळेत पाठविण्यास साशंक असल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर होणाऱ्या दुष्परिणामांंमुळे पालकांच्या मतप्रवाहात बदल होत असल्याचे दिसते आहे.
राज्य शासन किंवा आरोग्य विभागाकडून शाळांमध्ये सुरक्षिततेसाठी आवश्यक अशी सर्व खबरदारी आणि रॅपिड अँटिजन टेस्ट केली जाणे आवश्यक असल्याचे मत शाळांमध्ये मुलांना पाठविण्यास तयार असलेले पालक व्यक्त करीत आहेत. या चाचण्या शाळांमध्ये व्हायला नकोत, असे मत १५ टक्के पालक व्यक्त करीत आहेत. शाळा सुरू करण्याआधी लसीकरणाची मोहीम राबवून शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण करावे, असे मत ८९ टक्के पालकांनी व्यक्त केले आहे.
शिक्षणतज्ज्ञही म्हणतात शाळा सुरू करा
आरोग्य आणि शिक्षण विभाग यांनी समन्वय साधत जिल्हा केंद्रस्थानी ठेवून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास हरकत नसल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. मास्क, योग्य अंतर, शिक्षक व शिक्षकेतर वर्गाचे लसीकरण, दैनंदिन स्वच्छता, मुलांचे तापमान, सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळणे अशा गोष्टी पाळल्यास टप्प्याटप्प्याने आणि सुरुवातीला संमिश्र पद्धतीने शाळा सुरू करता येतील, असे मत अभ्यासक मांडत आहेत.