दुसरा डोस उशिरा घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा काळ लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:08 AM2021-05-05T04:08:29+5:302021-05-05T04:08:29+5:30
वैद्यकीय तज्ज्ञांचे मत; मात्र कोणतेही दुष्परिणाम नाही लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यासह मुंबईत सध्या १८ ते ४४ वयोगटातील ...
वैद्यकीय तज्ज्ञांचे मत; मात्र कोणतेही दुष्परिणाम नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यासह मुंबईत सध्या १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू आहे. तर ४५ हून अधिक वय असणाऱ्या लाभार्थ्यांचे लसीकरण बंद आहे. परिणामी, दुसरा डोस घेण्यापासून वंचित राहिलेले लाभार्थी डोस मिळेल की नाही, या चिंतेत आहेत. दरम्यान, लसीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा काळ लांबणीवर पडणार असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले, मात्र दुसऱ्या डोसला उशीर झाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम हाेणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्याचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, दोन्ही लसींकरिता दुसऱ्या डोसची मुदत ही वेगवेगळी आहे. कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला असेल तर चार आठवड्यांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे, तर कोविशिल्डचा पहिला डोस घेतला असल्यास सहा ते आठ आठवड्यांनी दुसरा डोस घेतला पाहिजे. लसीचा दुसरा डोस घेण्यास विलंब झाल्यास कोणताही दुष्परिणाम नाही, मात्र रोग प्रतिकारकशक्ती निर्माण होण्याचा काळ लांबणीवर जातो. राज्य शासनाकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर लसींची उपलब्धता होणे कठीण आहे, त्यामुळे दुसरा डोस घेणे बाकी असणाऱ्यांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे.
लसीचा पहिला डोस हा रोगाविषयीची प्रतिकारकशक्ती शरीरात निर्माण करत असतो. त्यामुळे शरीरात प्रतिपिंड तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. पण, दुसरा डोस ही प्रक्रिया अधिक वेगवान करतो. त्यामुळे प्रतिपिंड आणि प्रतिकारशक्ती काम करण्याचे प्रमाण वाढवते. पहिला डोस संसर्गाचा धोका कमी करत असला तरी दुसरा डोसही आवश्यक आहे, अशी माहिती संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. राहुल तांबे यांनी दिली.
* ...तर पुन्हा दोन्ही डोस घ्यावे लागणार
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर १४ दिवसानंतर ५० टक्के प्रतिपिंड शरीरात निर्माण होतात, तर लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर हे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहोचते. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीचे दुसरे डोस लांबणीवर पडल्यास ते तीन महिन्यांपर्यंत घेण्याची मुदत आहे. या मुदतीत ते न घेतल्यास लाभार्थ्यांना पुन्हा दोन्ही डोस परत द्यावे लागतील. यापूर्वीही पोलिओ, काॅलरा यासारखे आजार आपण लसीद्वारे नियंत्रित केले. परंतु सध्या राज्यात लसीचा तुटवडा असल्यामुळे दुसरा डोस घेणे बाकी असणाऱ्यांनी घाबरुन जाऊ नये, लसीचे डोस उपलब्ध झाल्यानंतर त्वरित यंत्रणेकडून प्राधान्याने लसीकरण केले जाईल.
- रामकृष्ण लोंढे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन (राज्य)
........................