Join us

"शाहरुखच्या मुलाचे खोट्या आरोपातून हाल होत असतील तर सर्वसामान्यांचं काय?"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 2:55 PM

नवाब मलिक जे सातत्याने म्हणत होते, ते आता कसं खरं होत आहे बघा.

मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे सीबीआय चौकशी सुरू असलेले एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला. या प्रकरणी पुढील सुनावणी ८ जूनला होणार आहे, त्यामुळे ८ तारखेपर्यंत समीर वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. आर्यन खान प्रकरणात सीबीआयने शनिवारी सुमारे ५ तास चौकशी केली. मात्र, समीर वानखेडे सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यावरुन, आता राष्ट्रवादीच्या खासदार सुपिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, नवाब मलिक जे बोलत होते, ते खरं होतं, असंही त्यांनी म्हटलंय. 

समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला होता. त्यावेळी त्यांना आजपर्यंत म्हणजेच, २२ मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आज त्यांच्या अटकेबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात कोर्टाने अटकेपासून संरक्षणाचा निर्णय कायम ठेवला असून पुढील सुनावणी ८ जूनला होणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांच्यात चांगलीच जुंपली होती. माध्यमांनीही तो विषय चव्हाट्यावर आणला होता. आता, याप्रकरणी नवाब मलिक तेव्हा जे सांगत होते तेच खरं होतं, असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

नवाब मलिक जे सातत्याने म्हणत होते, ते आता कसं खरं होत आहे बघा. हे दुर्दैवी असून मी नक्कीच हा विषय संसदेत मांडणार आहे. शाहरुख खानसारख्या मोठ्या फिल्म स्टारच्या मुलाचे असे खोटे हाल होऊ शकतात, तर या देशात सर्वसामान्य माय-बाप जनतेच्या पोरांनी काय करावं?, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

एवढ्या मोठ्या माणसाच्या मुलाला हे सरकार एवढा त्रास देऊ शकतं, तर सर्वसामान्य माणसांचं काहीच राहणार नाही. हे चिंताजनक आहे. माझी केंद्र सरकारला विनंती आहे, तुम्ही ईडी-सीबीआय काय वापरायचंय ते वापरा, पण लोकांच्या घरात घुसून त्यांच्या मुलावर अन्याय करू नका हो, अशी मागणीहीसुळे यांनी केलीय. आज शाहरुख खानचा मुलगा आहे, उद्या तुम्हा-आम्हाचा असू शकेल. हे लाजीरवाणं आहे, अशा शब्दा सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केला आहे.  

काय आहे प्रकरण

कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणातील सदोष तपास आणि आर्यन खानला सोडण्यासाठी मागितलेल्या २५ कोटी रुपयांच्या खंडणी आरोपावरून समीर वानखेडे यांची सीबीआयने चौकशी केली. तब्बल ५ तास ही चौकशी चालली. यावेळी वानखेडेंना सुमारे १५ ते २० प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हे प्रश्न आर्यन खान आणि किरण गोसावी यांच्यातील संबंध आणि छापेमारीच्या माहितीशी संबंधित होते अशी माहिती आहे. चौकशीनंतर मीडियाने समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र केवळ ‘सत्यमेव जयते’ असे म्हणत निघून गेले. त्यानंतर ते थेट सिद्धिविनायकाच्या दर्शनालाही गेले होते.

अटकेपासून संरक्षण

तपास एजन्सीने वानखेडे यांच्याकडून मुंबईतील कार्यालयात प्रकरणाशी संबंधित प्रत्येक पैलूंवर उत्तरे मागितली आणि लाच घेतल्याच्या आरोपांमध्ये त्याची भूमिका तपासली. चौकशीनंतर समीर वानखेडे सीबीआय कार्यालयातून बाहेर आले तेव्हा माध्यमांच्या प्रश्नांवर ‘सत्यमेव जयते’ म्हणत ते पुढे निघून गेले होते. त्यानंतर आता त्यांना अटकेपासून पुन्हा एकदा संरक्षण मिळाले आहे.

टॅग्स :आर्यन खानसुप्रिया सुळेसमीर वानखेडेशाहरुख खान