मुंबईत आल्यास सिद्धूचे हात-पाय तोडू, भाजपा नेत्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 12:00 PM2018-08-21T12:00:12+5:302018-08-21T12:01:49+5:30
माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला गेले होते.
मुंबई - माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला गेले होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बावजा यांची गळाभेटही घेतली. त्यानंतर आता सिद्धूवर चहूबाजूंनी टीका केली जातेय. भाजपाच्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सोमवारी मुंबईतल्या आझाद मैदानात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सिद्धू यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी सिद्धूचे पोस्टर जाळण्याचा प्रयत्नही केला, परंतु पोलिसांनी त्यांना रोखलं. या मोर्चादरम्यान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि दर्गा कमिटी अजमेरचे सदस्य मोहम्मद फारुख आजम यांनी सिद्धूला खडे बोल सुनावले आहेत.
ते म्हणाले, आम्ही जागोजागी धरणं आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत सिद्धूला अटक होत नाही, तोपर्यंत हे सुरू राहणार आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. सिद्धूनं जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, असंही ते म्हणाले आहेत. जमीतुल उलमाचे मुंबई अध्यक्षांनीही मौलाना कासमीनं सिद्धू यांच्यावर टीका केली आहे. मोर्चा संपल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सिद्धू यांचे पोस्टर्स जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना असं करण्यापासून रोखलं. याचदरम्यान सिद्धू मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. सिद्धूविरोधात बिहारच्या मुजफ्फरपूरमधल्या न्यायालयात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.