सायन उड्डाणपुलाच्या कामाला मुहूर्त मिळेना, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:45 AM2020-01-07T00:45:52+5:302020-01-07T00:46:00+5:30
पूर्व उपनगरातून मुंबईत प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सायन उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले आहे.
मुंबई : पूर्व उपनगरातून मुंबईत प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सायन उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. हे काम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) दरवेळेस जाहीर करण्यात येत आहे, मात्र हे काम सुरू करण्यास सुरुवात होत नसल्याने दुरुस्तीअभावी या उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यामुळे जर एखादी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीपूर्वीचे प्राथमिक काम नोव्हेंबरमध्ये सुरू झाले आहे. मात्र उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम लवकर संपवण्यासाठी आवश्यक असलेले अधिक जॅक
अद्याप एमएसआरडीसीकडे उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे कामाला
गती मिळू शकलेली नाही. यामुळे डिसेंबर २०१८ पासून हे काम रखडलेले आहे. उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्यासाठी आधी १२ जॅकचा
वापर करण्यात येणार होता, मात्र यासाठी जास्त अवधी लागणार
होता. यामुळे शंभर जॅकचा
वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे हे काम कमी
वेळेमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. परंतु अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही.
येत्या दोन दिवसांमध्ये वाहतूक विभागाच्या सहपोलीस आयुक्तांसोबत बैठक होणार असून या बैठकीमध्ये उड्डाणपुलाच्या भागामध्ये ब्लॉक घेण्याबाबत चर्चा करण्यात येणार असून ब्लॉक घेण्याबाबत ठोस योजना झाल्यावर लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यातर्फे सांगण्यात आले. तसेच आमची आता पूर्ण तयारी
झाली असून लवकरच कामालाही सुरुवात केली जाईल, असेही ते या वेळी म्हणाले.
चुनाभट्टीपासून पूर्व द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-कुर्ला संकुल यांना जोडणारा बीकेसी कनेक्टर ९ नोव्हेंबरला खुला झाला. यानंतर सायन सर्कलमधील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी झाली आहे.
मात्र दुसरीकडे वांद्रे-कुर्ला
संकुलात वाहतूककोंडीची नवीन ठिकाणे तयार झाली आहेत.
शीव उड्डाणपूल बंद केल्यावर
पुन्हा शीव सर्कल आणि
धारावी परिसरात कोंडी वाढण्याची शक्यता आहे.
>१७० बेअरिंग बदलण्याची शिफारस
सायन उड्डाणपुलाच्या सांध्यांमध्ये पोकळी निर्माण झाल्यामुळे पुलाचे १७० बेअरिंग बदलण्याची शिफारस आयआयटी मुंबईतर्फे संरचनात्मक तपासणीनंतर २०१८ मध्ये करण्यात आली होती.
यानंतर उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता.
मात्र गेले वर्षभर निविदा प्रक्रिया लांबल्यामुळे नंतर बेअरिंग बदलण्यासाठी अधिक जॅकचा वापर करण्याचे ठरल्यामुळे कामाला सुरुवातच झाली नव्हती.
२८ मार्च २०१९ ला उड्डाणपुलाच्या स्लॅबचा एक १० बाय ५ सेंमीचा तुकडादेखील कोसळला होता. यानंतर एप्रिलमध्ये दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात येणार होते, मात्र तेही लांबले. नवी मुंबई आणि पूर्व उपनगरातून शहरामध्ये प्रवेश करणाºया हजारो वाहनांना या पुलाचा वापर करावा लागतो. या पुलाच्या दुरुस्तीच्या काळामध्ये सायन सर्कलमध्ये वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे.
>जड वाहतूक बंद!
दुरुस्ती होईपर्यंत खबरदारीची उपाययोजना म्हणून उड्डाणपुलावरील जड वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार अजूनही अवजड वाहनांची वाहतूक या उड्डाणपुलावरून बंद आहे.
वाशी, नवी मुंबई आणि पुढे पुण्याला जाण्यासाठी हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामुळे या वाहनांवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. जर या पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडले तर धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.